मुंबई - हृतिक रोशनच्या सुपर ३० चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रेक्षकांसोबतच चित्रपट व्यापार विश्लेषकांनीही या चित्रपटाची भरपूर प्रशंसा केली आहे. गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आता अनेक राज्यांत करमुक्त करण्यात येत आहे.
सामान्य मुलांचा असामान्य प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात आला असून तो विद्यार्थ्यांना प्रेरित करणारा आहे. याच कारणामुळे या सिनेमाला बिहार आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आलं आहे. तर यापाठोपाठ आता हा सिनेमा उत्तर प्रदेशातही करमुक्त होण्याची शक्यता आहे.
सुपर ३० चे रिअल हिरो आनंद कुमार यांनी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनीही यावेळी चित्रपटाची प्रशंसा करत हा चित्रपट दृढ निश्चय आणि जिद्दीचं उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. अनेक अडचणींवर मात करत यश मिळवणं शक्य असल्याचं या चित्रपटात दाखवलं गेलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता हा चित्रपट उत्तर प्रदेशातही करमुक्त होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.