मुंबई - २००९ साली अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘देव डी’ प्रदर्शित झाला होता. त्यात माही गिल आणि अभय देओल यांनी स्क्रीन शेअर केली होती. आता २०२१मध्ये ही जोडी पुन्हा एकत्र येत आहे. आगामी ‘१९६२ द वॉर इन हिल्स‘ या वेबसिरीजमधून आपल्याला ही जोडी पुन्हा दिसणार आहे. यात माही गिल एका दृढनिश्चयी पत्नी आणि कनवाळू मातेच्या भूमिकेत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिरीजमध्ये अभय आणि माही व्यतिरिक्त सुमित व्यास, आकाश ठोसर आणि इतर बरीच नामवंत कलाकार मंडळी आहेत.
आतापर्यंत अनेक संस्मरणीय भूमिका केल्यानंतर अभिनेत्री माही गिल आगामी ‘१९६२ : द वॉर इन हिल्स’ सिरीजमध्ये दिसणार आहे. ती शगुन सिंग या सैनिकाच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. यापूर्वी अभय देओल आणि माही गिल दोघेही देव-डी चित्रपटामध्ये दिसले होते. हॉटस्टार स्पेशल सिरीज ‘१९६२ : द वॉर इन हिल्स’ ही खऱ्या घटनांनी प्रेरित असून ३ हजार चिनी सैनिकांविरूद्ध १२५ भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि निर्भय धैर्याची कहाणी सांगणार आहे.
लॉकडाऊनमध्ये प्रदर्शित झालेल्या आणि अक्षय कुमारची निर्मिती असलेल्या व भूमी पेडणेकर अभिनित ‘दुर्गामती’ चित्रपटात माही गिल महत्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. या मालिकेविषयी अभिनेत्री माही गिल म्हणाली, '१९६२ : वॉर इन हिल्स’ माझ्यासाठी खास आहे. एकदा मी सैन्यात अर्ज केला आणि माझी निवडही झाली होती. आज मला युद्ध मालिकेत मुख्य भूमिका निभावण्याची संधी मिळाली आहे हा कदाचित योगायोग असावा. या मालिकेत मी सैनिक नाही तर एक गौरवशाली सैनिक-पत्नी आहे. माझे पात्र शगुन ही एक सामान्य लष्करी पत्नी नाही, जी सहसा चित्रपट किंवा कार्यक्रमात दाखवली जाते, ती दृढ, खंबीर आहे आणि स्वत:च्या वैयक्तिक लढाईला सामोरे जाण्याची ताकत तिच्यात आहे."
हॉटस्टार स्पेशल प्रेझेंट्स ‘१९६२ : द वॉर इन हिल्स’ येत्या २६ फेब्रुवारीला डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपी आणि डिस्ने प्लस हॉटस्टार प्रीमियमवर रिलीज होणार आहे.