मुंबई - 'मोदी : सीएम टू पीएम' या वेब सीरिजच्या दुसर्या भागात अभिनेता महेश ठाकूर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार आहेत.
उमेश शुक्ला दिग्दर्शित या मालिकेत मोदींचा लहानपणापासून तारुण्यापर्यंतचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदी यांनी सलग तीन वेळा काम केले आणि अखेरीस ते भारताचे पंतप्रधान झाला हा सर्व प्रवास यात दाखवण्यात येणार आहे.
मालिकेच्या पहिल्या भागात अभिनेता आशिष शर्माने युवा नरेंद्र मोदीची भूमिका साकारली होती. महेश ठाकूर म्हणाले, "लहानपणापासूनच आपण आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्चर्यकारक प्रवासाविषयी ऐकले आहे. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये मोठा बदल घडवून आणणारी ही कहाणी आहे. अशी प्रतिष्ठित व्यक्तिरेखा साकारणे हा सन्मान आहे, पण यासह मोठ्या जबाबदारीही आहे. प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. मला खात्री आहे की, त्यांना मालिका आवडेल. "
या मालिकेचा दुसरा सीझन 12 नोव्हेंबरपासून इरॉस नाऊवर प्रसारित होईल.