मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सोमवारी आपला जवाब नोंदवण्यासाठी बोलावले गेलेले चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला कधीही प्रियकर सुशांतला सोडायला सांगितले नव्हते.
"सुशांतला सोडण्याबाबत मी रियाला कधीच काहीही बोललो नाही. या बद्दलच्या अफवा निराधार आहेत," असे ते म्हणाले. भट्ट यांनी असेही सांगितले की, सुशांतसिंह राजपूतला आतापर्यंत ते फक्त दोनदा भेटले होते.
"मी घराणेशाहीचे समर्थन करत नाही. मी बऱ्याच नवीन आलेल्या कलाकारांना पहिली संधी दिली आहे. सुशांत सिंगला मी फक्त दोनदा भेटलो आहे - २०१८ मध्ये एकदा माझ्या पुस्तकाबद्दल आणि पुन्हा २०२० मध्ये," अशी माहिती भट्ट यांनी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये जवाबाच्यावेळी दिली.
सुशांतसिंह साजपूतचा मृत्यू झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी रिया चक्रवर्ती हिने आपल्या प्रेमसंबंधाची कबुली दिली होती. त्याच्या मृत्यूची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी विनंतीही तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती.
काही कारणास्तव सुशांतसिंह राजपूतला त्यांच्या आगामी चित्रपट ‘सडक २’ मध्ये कास्ट करू शकलो नव्हतो असे महेश भट्ट यांनी सांगितले.
"सडक २ मध्ये सुशांतला कास्ट करणे काही कारणास्तव करू शकलो नाही. परंतु सुशांतने त्याच्यासोबत रियालाही कास्ट करण्यास सांगितले होते म्हणून त्याला सडक २ मधून वगळण्यात आले हे खरे नाही," असेही ते म्हणाले.
सडक 2 चित्रपटातून 21 वर्षानंतर दिग्दर्शक म्हणून महेश भट्टचे पुनरागमन होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट व्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्ट देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासात चित्रपट समीक्षक राजीव मसंद, दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी, आणि चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांच्यासह 40 जणांचे जवाब नोंदविण्यात आले आहेत.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीची पाटण्यातही होऊ शकते चौकशी?
याप्रकरणी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये ज्यांचे जवाब नोंदविण्यात आले आहेत त्यात राजपूतचे कुक नीरज सिंग, घरगुती मदत केशव बचनर, मॅनेजर दीपेश सावंत, क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ रामनाथमूर्ती पिठानी, बहीण नीतू आणि मीतू सिंग हे आहेत.
टीव्ही अभिनेता महेश शेट्टी, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा, बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी, पीआर मॅनेजर अंकिता तहलानी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, यशराज फिल्म्सचे दोन माजी कर्मचारी आणि इतरांनीही त्यांचे जवाब नोंदवले आहे.