मुंबई - आमिर खान आणि करिना कपूर खान यांनी आतापर्यंत दोन चित्रपटांत स्क्रीन शेअर केली आहे. 'तलाश' आणि '३ इडियट्स' चित्रपटांतून ही जोडी ऑनस्क्रीन एकत्र झळकली होती. यानंतर आता तिसऱ्यांदा ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहे.
'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटाच्या स्टारकास्टविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून यात आमिरच्या अपोझिट अभिनेत्री करिना कपूर खानची वर्णी लागली आहे. थ्री इडियट्समधील या जोडीच्या केमिस्ट्रीला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
‘फॉरेस्ट गम्प’ ही विन्स्टन ग्रुम यांची कादंबरी १९८६ मध्ये प्रकाशित झाली होती. यावरच हा चित्रपट आधारित असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अद्वित चंडन करत असून 'वायकॉम १८' स्टूडिओज आणि आमिर खान प्रॉडक्शन संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. २०२० मध्ये ख्रिस्मसला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.