मुंबई - 'एम. एस. धोनी' फेम अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आगामी 'शेरशाह' चित्रपटात ही जोडी एकत्र झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून कियाराने सिद्धार्थसोबतचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
चित्रीकरणादरम्यान सिद्धार्थ आणि कियारा यांच्यातील वाढती जवळीकता पाहता दोघांच्या नात्याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याबद्दलच बोलत माझा अफवांमधील प्रियकर आणि खऱ्या आयुष्यातील मित्र, तुझ्यासोबतचा कामाचा अनुभव उत्तम होता. पुन्हा नव्या चित्रपटासाठी नक्कीच एकत्र येऊ असे कॅप्शन देत कियाराने फोटो शेअर केला आहे.
![kiara advani](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3348894_kiara.jpg)
तर तिचं हे ट्विट रिट्विट करत सिद्धार्थने याला खास कॅप्शन दिलं आहे. अफवा खोट्या असू शकतात. मात्र, आपल्या चेहऱयावरील ते हास्य सगळं खरं सांगतं, असं त्याने म्हटलं आहे. दरम्यान 'शेरशाह' चित्रपटाची कथा कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या विक्रम बात्रा या खऱ्या हिरोवर आधारित असणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.