मुंबई - 94 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ऑस्करच्या इतिहासात कायमचे कोरले जातील असे अनेक क्षण होते. विल स्मिथने होस्ट ख्रिस रॉकला मारलेल्या थप्पडीचा आवाजही या इतिहासात लिहून ठेवला जाईल. अभिनेता विल स्मिथने 94 व्या अकादमी पुरस्कारादरम्यान कॉमेडियन ख्रिस रॉकला थोबाडीत मारल्यानंतर जगभरातून इंटरनेटवर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही यावर आपली मते मांडली आहेत.
अभिनेत्री कंगना रणौतने देखील या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, “कोणी मूर्खाने माझ्या आई किंवा बहिणीच्या आजाराचा वापर करून मूर्खांना हसवले तर मी त्याला विल स्मिथ प्रमाणे थप्पड मारेन... वाईट पध्दत... आशा आहे की तो माझ्या लॉकअप मध्ये येईल"
विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट हिच्यावर होस्ट असलेल्या ख्रिस रॉकने विनोद करण्याचा प्रयत्न केला होता. यावर नाराज झालेल्या विल स्मिथने ऑस्कर सोहळ्याच्या मंचावरच रॉकला थोबाडीत मारली होती. त्यानंतर कार्डी बी, मारिया श्रीव्हर, ट्रेव्हर नोह यांच्यासह अनेक हॉलिवूड स्टार्सनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे स्टेजवरील या भांडणावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या बाचाबाचीमुळे समारंभातील अनेकजणही थक्क झालेले दिसले.
व्हरायटीनुसार, डॉक्युमेंटरी फिचर श्रेणीसाठी ऑस्कर सादर करण्यासाठी ख्रिस रॉक स्टेजवर हजर झाला आणि त्यानंतर त्याने जाडा-पिंकेट स्मिथ (विल स्मिथची पत्नी) 'जी.आय.'मध्ये असल्याबद्दल विनोद केला. गेल्या वर्षी जाडा पिंकेट स्मिथने एलोपेशियाशी झुंज दिल्यानंतर तिचे मुंडण केल्याचे जाहीर केले होते. सुरुवातीला स्मिथ हसत होता पण जाडा या विनोदाने प्रभावित झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यानंतर स्मिथ रॉकला मारण्यासाठी स्टेजवर गेला. या घटनेच्या काही मिनिटांनंतर स्मिथला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आले. आणि त्याच्या स्वीकृती भाषणादरम्यान, त्याने आपल्या वागण्याबद्दल माफी मागितली. लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी ९४ वा अकादमी पुरस्कार सोहळा पार पडला.
हेही वाचा - Will Smith Apologizes: विल स्मिथचा माफीनामा : ''मी मर्यादा ओलांडली आणि मी चूक होतो''