मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) रितेश शहा यांची अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी चौकशी करीत आहेत.
रिया आणि तिचा (रियाचा) भाऊ यांच्या मालकीच्या कंपन्यांबद्दल चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी 11.30 वाजता रितेश शाह ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाले.
सोमवारी ईडीने सुशांतचे चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांना मुंबईतील आर्थिक व्यवहाराबद्दल विचारले होते. शुक्रवारी रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध ईडीने दाखल केलेल्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. सुशांतसिंहच्या आत्महत्येशी संबंधित असलेल्या व्यवहाराच्या प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. के. के. सिंह यांनी नुकतीच रियाविरूद्ध बिहार पोलिसात तक्रार दाखल केली होती.
बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने या प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचे नाव जोडले आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, एजन्सी येत्या काही दिवसांत याप्रकरणी चौकशीसाठी अनेक लोकांना बोलवेल. सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या दोन कंपन्यांचा तपशील मागवला गेला आहे.
हेही वाचा - सीबीआय चौकशीच्या शिफारसीवरून राजपूत कुटुंबीयांना दिलासा, सुशांतच्या भावाची माहिती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने गुरुवारी बिहार पोलिसांकडून रियाविरूद्ध एफआयआर दाखल केला होता आणि बँकामधून सुशांत आणि रियाच्या दोन कंपन्यांचा तपशील मागवला होता. ईडीने विव्रिडेज रियलिटिक्सच्या आर्थिक देवाणघेवाणीचा तपशीलही मागवला आहे, ज्याच्यात रिया एक संचालिका आहे. यासोबतच फ्रंट इंडिया फॉर वर्ल्डचीही माहिती मागवली आहे, यात रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती संचालक आहे.
सुशांतच्या वडिलांनी आपल्या मुलावर फसवणूक व धमकी दिल्याचा आरोप करत रियाविरोधात पाटणा येथे एफआयआर दाखल केली होती. यात त्यांनी रियावर अनेक आरोप केले आहेत, ज्यात आपल्या मुलाकडून पैसे घेतल्याचे आणि त्याचा वैद्यकीय अहवाल माध्यमांसमोर जाहिर करण्याची धमकी देण्याचा आरोप रियावर केला आहे.
सुशांतच्या कुटुंबीयांनीही रियावर सुशांतला आपल्यापासून दूर ठेवल्याचा आरोप केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची त्यांच्या सरकारने शिफारस केली आहे.