मुंबई - एकेकाळची वर्ल्ड नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे जीवन खूपच इंटरेस्टिंग राहिले आहे आणि तिच्या जीवनावर आधारित ‘सायना’ हा बायोपिक येऊ घातलाय. या चित्रपटात सायना नेहवालची भूमिका याआधी श्रद्धा कपूर करणार होती. तिने या चित्रपटासाठी जय्यत तयारी सुरु केली होती आणि काही दिवसांचं चित्रीकरणही झालं होतं असं समजतं. परंतु काही कारणास्तव तिने या चित्रपटातून माघार घेतली व हा बायोपिक बनतो की नाही असे वातावरण निर्माण झालं होतं. नंतर दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी परिणीती चोप्रा ला हा चित्रपट ऑफर केला व आता सायना नेहवालच्या भूमिकेत आता परिणीती दिसणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आणि यावेळी परिणीती खूश दिसत होती. या चित्रपटासाठी परिणीती ने खूप मेहनत घेतली असून आधी तिला वाटायचे की तिला बॅडमिंटन खेळायला येते. ‘तू बॅडमिंटन रॅकेटच चुकीची पकडली आहेस’, असे तिच्या कोचने पहिल्याच दिवशी सांगितले तेव्हा तिला कळून चुकले की तिला बॅडमिंटनचा श्रीगणेशा गिरवावा लागणार आहे. त्यानंतर पाच सहा महिने अथक परिश्रम घेत परिणीतीने बॅडमिंटन शिकली परंतु तेही बेसिकचं होते असे ती सांगते. ‘आपण आपल्या सोसायटीच्या प्रांगणात खेळतो त्याला आपण बॅडमिंटन बोलतो परंतु खरे बॅडमिंटन खूप वेगळे आहे हे मी त्याचे बॅडमिंटन ट्रेनिंग करायला लागल्यावर उमजले.’ ज्या लेव्हल ला तिचा कोच, छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेता, ईशान आणि नायशा, जी छोट्या सायनाची भूमिका करतेय व नॅशनल ज्युनियर डबल्स नं १ आणि सिंगल्स नं ३ आहे, खेळतात ते ती स्वप्नातही खेळू शकणार नाही असे ती ठासून सांगते. हा चित्रपट चॅलेंज आहे की रिस्क, यावर परिणीती उत्तरली, ‘माझ्यासाठी ही फिल्म चॅलेंज आहे कारण प्रत्येक फिल्म ही रिस्क असते.’
हरयाणातील हिसार मध्ये मध्यम वर्गीय कुटुंबातील एक सामान्य मुलगी ते बॅडमिंटनमधील वर्ल्ड नं १ पर्यंतचा सायना नेहवालचा प्रवास ‘सायना’ मधून घडणार असून तिच्या खेळासोबतच तिच्या मानसिक, भावनिक, शारीरिक स्थित्यंतराचा मागोवा घेण्यात आला आहे. जेव्हा सायना फायनल्स जिंकायची तेव्हा भारताचे राष्ट्रगीत वाजायचे आणि ते तिला भारावून टाकायचे. तसेच परिणीती चोप्राला सुद्धा, जेव्हाही ते वाजते तेव्हा ते तिला भारावून टाकते. ‘मला आपले राष्ट्रगीत वेगळीच ऊर्जा देते. ते सुरु झाले की आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो, माझ्या डोळ्यात अश्रूही तरळतात आणि मी हे पब्लिसिटी साठी बोलत नाहीये. माझ्यासाठी राष्ट्रगीत माझे सर्वकालीन फेवरेट कंपोझिशन आहे, सर्वात बेस्ट कंपोझिशन आहे; असे परिणीती चोप्रा गर्वाने सांगते.
हेही वाचा - ‘अवांछित' चित्रपटाच्या निमित्ताने बंगाली-मराठी कलावंत पडद्यावर एकत्र!