मुंबई - कोरोनामुळे लोकगायक आणि मनोरंजन इंडस्ट्रीला खूप मोठा फटका बसल्याचे मत अभिनेत्री आणि लोकगायिका इला अरुण यांनी व्यक्त केले आहे. इला अरुण यांनी काही खासगी कंपन्यांना या कलाकारांच्या मदतीसाठी पुढे येण्याची विनंती केली आहे. या संसर्गजन्य आजारामुळे शारीरिक अंतर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याचे त्यांनी सांगितले.
'मी लोकगायिका म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यक्रम घेत आहे. तसेच रंगकर्मी म्हणूनही काम करतीये. गेल्या काही वर्षांमध्ये लाइव्ह परफॉर्मिंग आर्टला सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र, त्यानंतरही आम्ही टिकून राहिलो आहोत. माझ्याकडे उदरनिर्वाहासाठी अनेक पर्याय आहेत. मात्र, असे अनेक कलाकार आहेत. ज्यांच्याकडे रोजगाराचा दुसरा कोणताच पर्याय नाही. येत्या काळातही मोठ्या संख्येने लोक गोळा होऊ शकतील, असे कार्यक्रम घेणे शक्य नाही. त्यामुळे पूर्णतः सरकारवर अवलंबून न राहता काही खासगी कंपन्यांनी समोर येत या कलाकारांची मदत करावी,' अशी विनंती इला यांनी केली.
'आम्ही कलाकार आमचे आयुष्य कलेला समर्पीत करतो. आम्ही एका रात्रीत आमचा व्यवसाय बदलू शकत नाही. मात्र, मला आशा आहे, एक दिवस असा नक्की उजाडेल जेव्हा लोक या आभासी आणि इंटरनेटवरील कार्यक्रमांपेक्षा लाईव्ह कार्यक्रमांना हजर राहू शकेल. फक्त तोपर्यंत आम्हा कलाकारांना तुमची मदत हवी आहे', अशी विनंती इला अरुण यांनी केली.
इला अरुण यांनी चोली के पिछे, मोरनी बागा मा बोले आणि रिंगा रिंगा सारखी प्रसिद्ध गाणी गायली आहेत.