मुंबई - कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगाचा वेग मंदावला आहे. अनेक व्यवसायांसह मनोरंजन जगतही लॉकडाऊनमुळे डबघाईला आले आहे. या व्यवसायात काम करणाऱ्या लाखो कर्माचाऱ्यांवर, कलाकारांवर उपासमारीचा प्रसंग ओढवलाय.
या कठीण प्रसंगी अभिनेता ह्रतिक रोशनने आपला मदतीचा हात पुढे केलाय. सध्या असंख्य चित्रपटांची निर्मिती थांबली आहे. शूटिंगच्या सेटवर काम करणाऱ्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना आणि डान्सर्सना याचा मोठा फटका बसलाय. बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को यांनी सांगितले की ह्रतिक रोशनने त्याच्यासोबत काम केलेल्या १०० डान्सर्सच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली आहे.
बॉलिवूड गाण्याचे डान्स कोऑर्डिनेटर राज सुरानी यांनी सांगितले, ''ह्रतिक रोशन यांनी या कठिण प्रसंगात १०० डान्सर्सची मदत केली आहे. यातील काहीजण आपल्या गावी परतले आहेत. तर काहींना घरभाडे देणेही मुश्किल झाले आहे. एका डान्सरचा परिवार कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आला आहे. अशावेळी ह्रतिक रोशन यांची मदत महत्त्वाच्यावेळी मिळाली आहे.''
हेही वाचा - संजना सांघीचा कंगनावर पलटवार, म्हणाली...
त्यांनी पुढे सांगितले, ''त्यांच्या खात्यात ह्रतिक रोशन पैसे जमा करीत आहेत हा जेव्हा त्यांना मेसेज मिळाला तेव्हा त्यांना आनंद झाला. कोव्हिड संकटाच्या काळात त्यांनी मदत केल्याबद्दल सर्व डान्सर्सने ह्रतिकचे आभार मानले.''
सर्व डान्सर्सनी ह्रतिकचे आभार व्यक्त केले आहेत. सुरानी यांनी सांगितले की, साथ सुरू झाल्यापासून ह्रतिक त्यांची मदत करीत आहेत. त्यांना मास्क दान करणे, आवश्यक असलेल्यांना जेवण देणे अशा प्रकारे त्यांनी आपल्या परीने मदत केली आहे.