नवी दिल्ली - बॉलिवूड गायक यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार यांनी त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिने दिल्लीच्या तिस हजारी न्यायालयात 'घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण' कायद्यांतर्गत याचिका दाखल केली आहे. तिस हजारी न्यायालयाच्या तानिया सिंह मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यासमोर 3 ऑगस्ट रोजी याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कायदेविषयक फर्म करंजवाला अँड कंपनीचे वकील संदीप कपूर, अपूर्व पांडे आणि जीजी कश्यप न्यायालयात हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार यांच्या वतीने हजर झाले. न्यायालयाने हनी सिंगला 28 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्यासाठी नोटीस बजावली आहे. शालिनी तलवारच्या बाजूने अंतरिम आदेशही दिले आहेत. तसेच हनी सिंगला त्याच्या संयुक्त मालकीच्या मालमत्तेची सुरक्षा राखण्याचा आदेशही देण्यात आलाय.
2014 मध्ये रियालिटी शो इंडियाज रॉस्टारच्या एका भागात हनी सिंगने आपल्या पत्नीला प्रेक्षकांसमोर आणले. बॉलिवूडच्या मेगा प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यापूर्वीच त्याने लग्न केल्याने अनेकांना धक्का बसला होता.
यो यो हनी सिंग हे दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान यांच्या कॉकटेल चित्रपटातील अंग्रेजी बीट हे गाणे सुपरहिट झाले. 2011 मध्ये हे गाणे अव्वल स्थानावर होते.
वादग्रस्त हनी सिंग
2012 मध्ये दिल्लीत झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर हनी सिंगने एक अश्लिल गीत गायले होते. यामध्ये महिलांचा अपमान होत असल्याने त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. हा खटला उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता.
अक्षय कुमारच्या बॉस या सिनेमात हनीने पार्टी ऑल नाईट हे गीत गायले होते. यात काही अश्लिल शब्दांचा वापर झाला होता. याबद्दल त्याला दिल्ली उच्च न्यायालयाच्या चकरा माराव्या लागल्या होत्या.
हेही वाचा - भुज - द प्राईड ऑफ इंडिया नवा ट्रेलर : अजय देवगणची पुन्हा डरकाळी