हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक प्रयोगशील कलाकृती बनत असतात. यापैकीच एक सृजनशील दिग्दर्शक म्हणून रितेश बात्राकडे पाहिले जाते. 'लंच बॉक्स'सारखा एक जबरदस्त सिनेमा दिल्यानंतर आता त्यांनी 'फोटोग्राफ' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
मुंबईच्या झोपडपट्टीत राहून गेट वे ऑफ इंडियावर पर्यटकांचे फोटो काढणाऱ्या रफीक या फोटोग्राफरची ही कथा आहे. रफीकची व्यक्तीरेखा साकारली आहे हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने.
गेट वे ऑफ इंडियावर फिरायला येणाऱ्या लोकांना फोटो काढण्यासाठी विनंती करणाऱ्या रफीकला मिलोनी भेटते. साध्या, निरागस मिलोनीचा तो फोटो काढतो. गावाकडे राहणाऱ्या आपल्या आजीला तो मिलोनीचा फोटो पाठवतो आणि नुरीच्या प्रेमात असल्याचे कळवतो. नातवाचे लग्न ठरतेय म्हटल्यावर आजी मुंबईला पोहोचते आणि नुरीला भेटण्याची इच्छा व्यक्त करते. रफीक मिलोनीला आजीची भेट घेण्याची विनंती करतो आणि ती तयार होते.
मिलोनी ही एक मध्यमवर्गिय गुजराती मुलगी आहे जी सीएचा अभ्यास करीत असते. रफीकमधील साधेपणा तिला भावतो. ती आजीला तर भेटते पण ती त्याच्या प्रेमात पडते का ? ते लग्न करतात का ? त्यांच्या आयुष्यात पुढे नेमके काय घडते हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट जरुर पाहावा लागेल.
अस्सल रोमँटिक नवाज यात पाहण्यासारखा आहे. मोजक्या संवादातून त्याने फोटोग्राफर रफीक बिनधास्त साकारलाय. सान्याने साकारलेली मिलोनी खूपच सुंदर आहे. फारुक जाफर यांनी साकारलेली आजीची भूमिका संस्मरणीय आहे. चित्रपटातील काही प्रसंगांत जुन्या गाण्यांचा करण्यात आलेला वापर अतिशय भावणारा आहे. काही प्रसंग थोडे संथ झालेत पण एकंदरीत उत्तम सिनेमा बनलाय. नवाजुद्दीनच्या चाहत्यांसाठी तर ही एक प्रकारची पर्वणीच आहे.