मुंबई - आमिर खानची भूमिका असलेल्या 'मेला' या २००० मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात गुज्जर सिंगची भूमिका साकारलेला अभिनेता टीनू वर्मा यांना मारहाण झाली आहे. बुधवारी रात्री अधेरी परिसरात काही लोकांनी टीनू यांना बेदम मारहान केली व त्यांच्या हातातील महागडे घड्याळ व चेन घेऊन ते निघून गेले. या घटनेनंतर टीनूने मुंबईच्या आंबोली पोलिस ठाण्यात तीन ते चार जणांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.
टीनू वर्मा एका व्यक्तीचा शोध घेत असताना ही मारहाणीची घटना घडली आहे. त्या व्यक्तीने टीनूकडून पैसे घेतले होते आणि परत करीत नव्हता. तो व्यक्ती नेहमीच लपून राहतो व सतत जागा बदलत राहतो.
जुलै महिन्यात टीनू यांच्याकडे समीक बसू नावाची एक व्यक्ती आली होती. तो स्वतःला एक निर्माता असल्याचे सांगत होता. त्याने टीनूला वेब सिरीजमध्ये काम करण्याची ऑफर दिली. बसूने सांगितले की एक अॅक्शन मास्टर आणि कलाकार म्हणून त्याला टीनू वेब सिरीजमध्ये हवा होता. ही वेब सिरीज अल्लाउद्दीन खिलजीवर बनणार असल्याचे त्याने सांगितले होते.
टीनू म्हणाला, ''त्याची कथा ऐकून मी खूपच प्रभावित झालो आणि काम करण्यास तयार झालो. त्यानंतर त्याने मला व्हाट्सअप ग्रुपमध्ये अॅड केले. त्यानंतर तो माझ्या ऑफिसमध्ये आला आणि म्हणाला की त्याचे पैसे येणार होते मात्र काही कारणाने ते अडकले आहेत. त्याने माझ्याकडे तीन लाख मागितले आणि मी ते दिले. ७ दिवसात परत करतो असे तो मला म्हणाला होता.''
पुढे टीनू म्हणाला, ''या काळात त्याने मला अनेक वेळा चेक दिले आणि ते बाऊन्स झाले. महिन्यानंतर इतरही काही जणांनी मला सांगितले की त्यांच्याकडूनही त्याने पैसे घेतले आहेत. त्यानंतर माझ्या लक्षात आले की तो फसवणारा आहे आणि मी त्याच्याकडे पैसे मागायला सुरूवात केली. त्यानंतर त्याने माझे फोन उचलणे बंद केले.''
हेही वाचा - सरसेनापती हंबीररावमध्ये 'हा' अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराज!