मुंबई - गणेश आचार्यने सरोज खान यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटलंय. गणेश आचार्य हा डान्सर्सचे शोषण करतो, तसेच सिने डान्सर्स असोसिएशन ( सीडीए )ला बदनाम करीत असल्याचा आरोप शुक्रवारी केला होता.
यावर आचार्य म्हणाला, ''सरोजजी चुकीचे बोलत आहेत. जेव्हा सीडीए बंद झाले होते तेव्हा आमच्या मदतीला त्या का आल्या नव्हत्या ? १५ लाख रुपये घेऊन ५ लोकांना सीडीएचे को-ऑर्डिेटर बनवले होते. २१७ लोकांनी सह्या करुन सांगितले होते की त्यांना को-ऑर्डिेटरची गरज नाही. फेडरेशनच्या लोकांना डान्स तरी येतो का? त्यांना कसे कळणार की कोण चांगला डान्सर आहे.''
गणेश आचार्य पुढे म्हणाला, ''सरोजजींना डान्सर्सच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. सीडीएमध्ये पुन्हा निवडणुकीची गरज आहे.'
सरोज खान सीडीएचे प्रतिनिधीत्व करीत आहेत आणि दशकापासून त्या काम करतात. त्यांनी गणेशवर आरोप केला होता की, त्याने नवीन संघटना उभी केली आहे आणि सीडीएबद्दल वाईट बोलले जात आहे. जास्त पैसे देऊन त्यांच्या डान्सर्सला फोडत असल्याचा आरोपही सरोज यांनी केला होता.
याला उत्तर देताना गणेश आचार्य म्हणाला, ''२०१८ ला झालेल्या कायदेशीर लढाईत सीडीए ६ महिण्यापूर्वी बंद झाले होते. असे असताना काहींनी कोर्टाचे ऑर्डर न दाखवता पुन्हा उघडले आणि निवडणूका न घेताच पदे भरुन टाकली. आता त्या डान्सर्सना पुन्हा सहभागी होण्यासाठी सांगत आहेत. मी डान्सर्ससोबत उभा आहे. मी भावनात्मक पध्दतीने त्यांच्याशी जोडलेला आहे. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून बोलत आहेत.''
आचार्य आणि त्याचे वडिल सीडीएशी संबंधीत होते. डान्सर्सना कमी पैसे दिले जातात असा आरोप त्याने सीडीएवर केला होता.