मुंबई - लोक कोणताही दबाव न घेता बाहेर पडून आपला आवाज उठवत आहेत, हे पाहून बरे वाटते अशी प्रतिक्रिया अभिनेत्री दीपिका पदुकोणने दिली आहे. सीएए, एनआरसी आणि जेएनयू हल्ल्यानंतर देशभर हजारो लोक याविरुध्द आंदोलन करीत आहेत या पार्श्वभूमीवर दीपिका बोलत होती.
'छपाक' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी दीपिकाने आपले मत व्यक्त केले. समाजात बदल घडवून आणण्यासाठी लोकांनी व्यक्त होणे जरुरीचे असल्याचे दीपिका म्हणाली.
दीपिका यावेळी बोलताना म्हणाली, ''स्वतःला व्यक्त होताना आम्ही घाबरलेलो नाही आहोत, याचा अभिमान वाटतो. देशाच्या भवितव्यासाठी आपण विचार करतोय असे मला वाटते. आपला याकडे पाहण्याचा दृष्टीकोण काहीही असला तरी जे घडतय पाहायला चांगले आहे.''
''लोक बाहेर पडत आहेत याचा मला अभिमान वाटतो. मग ते रस्त्यावर असो की आणखी कुठे, ते आपला आवाज उठवत आहेत आणि आपली मते प्रदर्शित करीत आहेत हे महत्त्वाचे.'' , असे दीपिका म्हणाली.
सोमवारी रात्री जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात मुंबईत आंदोलन पार पडले. यावेळी बॉलिवूडमधील विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप, झोया अख्तर आणि तापसी पन्नू, रिचा चढ्ढा या कलाकारांनी कार्टर रोड येथे सहभाग घेतला.
आतापर्यंत स्वरा भास्कर, दिया मिर्झा, अली फझल, सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, राहुल ढोलकिया आणि नीरज घायवान या बॉलिवूड सेलेब्सनी जेएनयू हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र अमिताभ बच्चन, सलमान, शाहरुख, आमिर खान या मंडळींनी आपले मौन कायम ठेवले आहे.
मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलाला 'छपाक' हा चित्रपट येत्या शुक्रवारी देशभर प्रदर्शित होत आहे.