मुंबई: राजकुमार हिरानीच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख झळकणार आहे. यावर्षी ऑगस्टला सिनेमाचे शूटिंग सुरू होणार होते. मात्र कोरोना संक्रमणामुळे शूटिंच्या तारखामध्ये फेरबदल करावा लागलाय. सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या तर यावर्षाच्या अखेरीस शाहरुख शूटिंग सुरू करू शकेल.
या चित्रपटाशी संबंधित सूत्राने ही माहिती दिल्यामुळे शहरुखच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.
“राजू हिरानींच्या सर्व चित्रपटांप्रमाणेच हादेखील गंभीर, जगाला भेडसवणाऱ्या विषयाभोवती फिरणारा हा विनोदी चित्रपट असेल. या चित्रपटाची कथा पंजाब आणि कॅनडाच्या पार्श्वभूमीवर घडते,'' असे चित्रपटाशी संबंधित सूत्राने सांगितले.
"हा माणूस आनंदी आहे, तो आपल्याला हसवेल आणि भावनिक करेल," असे सूत्राने पुढे सांगितले. या सिनेमासाठी शाहरुख खान केसदेखील वाढवित आहे. अलिकडे त्याच्या मन्नत बंगल्याच्या बाल्कनीत जे शूटिंग पार पडले होते त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्याचे वाढलेले केस दिसतात.
हिरानी यांनी लेखक अभिजात जोशींसोबत यापूर्वी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. हिरानी यांनी यावेळी कनिका धिल्लन यांचेही सहकार्य घेतले आहे. जोशी या प्रक्रियेत सहभागी आहेत. तिघेजण मिळून चित्रपटाच्या कथेला अंतिम स्वरुप देत आहेत.
“चित्रपटासाठी परदेशात लांब पल्ल्याच्या शूटची आवश्यकता आहे आणि प्रवासावरील निर्बंध कमी होईपर्यंत ते थांबतील. जर गोष्टी लवकरच सामान्य झाल्या तर वर्ष संपण्यापूर्वीच शूटिंगला सुरूवात होईल,” अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा - प्रियंका चोप्राने यापूर्वीच सुरू केलंय 'मॅट्रिक्स 4'चे शूटिंग ?
दरम्यान, किंग खान अली अब्बास जफर, राज आणि डीके, अटली आणि इतर अनेक दिग्दर्शकांशी बोलताना दिसत आहे. निर्माता म्हणून, त्याच्या खिशामध्ये भरपूर प्रकल्प आहेत. सध्या तो अभिषेक बच्चन-स्टारर थ्रिलर 'बॉब बिस्वास' या चित्रपटाची निर्मिती करीत आहे.