मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा नेहमीत वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. प्रत्येक नव्या चित्रपटात त्याचा एक वेगळाच अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळतो. असाच वेगळा आशय आणि अवतार घेऊन आयुष्मान 'ड्रीम गर्ल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील आयुष्मानचे फोटो शेअर करण्यात आले होते. ज्यात तो साडीत दिसत होता. यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अशात आता या सिनेमाचा भन्नाट विनोदी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
रामायणातील सितेपासून कृष्णाच्या राधेपर्यंत आणि एका सामान्य मुलीपर्यंतची पात्रे यात आयुष्मान साकारताना दिसतो. हुबेहुब मुलीसारखा आवाज काढणारा आयुष्मान आपल्या या कौशल्याचा वापर करत अनेकांची 'ड्रीम गर्ल' बनताना आणि फिरकी घेताना या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. तर या सर्वादरम्यान घडणारे अप्रतिम विनोद प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात.
आयुष्मान खुराणा आणि नुसरत भरूचा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्या यांनी केलं आहे. तर या सिनेमाची निर्मिती शोभा कपूर आणि एकता कपूर यांची आहे. येत्या १३ सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.