मुंबई - नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश कुठे आहे, याबद्दल कोणालाच माहिती नाही. सोमवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एनसीबी ड्रग अँगलचा तपास करत आहे.
चौकशीत संबंधित एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले की, करिश्मा प्रकाशला चौकशीसाठी बोलावले गेले तेव्हापासून तिचा काही थांगपत्ता लागलेला नाही ही गोष्ट खरी आहे.
करिश्माची तारीख चुकली
एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले की, तिला २७ ऑक्टोबरला एनसीबीसमोर हजर राहण्यास सांगितले. मात्र, क्वान टॅलेंट मॅनेजमेंटच्या कर्मचार्यांनाही चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे, याची खातरजमा झालेली नाही असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या महिन्यात एनसीबीने तिच्या घरातून १.७ ग्रॅम चरस व काही बाटल्या सीबीडी तेल ताब्यात घेतल्यानंतर नवीन समन्स बजावण्यात आले होते.
श्रद्धा, साराचीही झाली आहे चौकशी
यापूर्वी दीपिका आणि करिश्मा प्रकाश एकदा एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. एजन्सीने करिश्माला पुन्हा चौकशीसाठी बोलावले तेव्हापासून ती बेपत्ता झाली आहे. दीपिकाशिवाय एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही चौकशी केली होती.
एनसीबीने या तिन्ही अभिनेत्रींचे फोनही जप्त केले होते आणि फॉरेन्सिक विभागात तपासासाठी पाठविले आहेत.