मुंबई - 'कागर' चित्रपटातील युवराज आणि राणी म्हणजेच शुभंकर आणि आर्चीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगत आहे. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. तर शुभंकर तावडे या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे.
चित्रपटाच्या टीझरला आणि ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती तर मिळालीच आहे. पण यासोबतच चित्रपटामधील संगीतालादेखील प्रेक्षकांची दाद मिळत आहे. आता नुकतंच कागर चित्रपटातील “दरवळ मव्हाचा” हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ज्यामध्ये युवराज आणि राणीचे हळूवार फुलत जाणारे प्रेम पाहायला मिळते.
रिंकू या गाण्यामधील दोन्ही लुक्समध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. याआधी 'लागलीया गोडी तुझी' आणि 'नागिन डान्स' या गाण्यांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटामधील गाण्यांबरोबरच संवाद देखील लोकांच्या तितकेच पसंतीस उतरत आहेत. येत्या २६ एप्रिलला कागर हा सिनेमा प्रदर्शित होतोय. रिंकू आणि शुभंकर यांच्या जोडीला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.