मुंबई - अभिनेता दर्शन कुमारने प्रियांका चोप्रा अभिनित ‘मेरी कॉम‘ मधून तिच्या पतीच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या अभिनयाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नंतर एनएच १०, सरबजित आणि बागी-२ यासारख्या बड्या हिंदी चित्रपटांमध्ये सहभागी होत व ताकतीचा अभिनय करत त्याने आपले बॉलिवूडमधील स्थान बळकट केलेले आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी सर्वांनाच फटका बसला. बॉलिवूडसकट अख्खी मनोरंजनसृष्टी घरात बसून होती. दर्शन कुमार देखील घरातच बसून होता परंतु नाउमेद न होता त्याने विविध गोष्टी आत्मसात केल्या व त्याच्यामते त्याच्यासाठी २०२१ हे वर्ष चांगल्या बातमीने उघडले आहे. त्याने, टी-सिरीज निर्मित एका सस्पेन्स थ्रिलर चित्रपटासाठी, विचारणा झाल्यावर होकार कळविला आहे. महत्वाचं म्हणजे तो या चित्रपटाद्वारे आर माधवन सोबत स्क्रीन शेयर करणार आहे.
याबद्दल बोलताना हा अभिनेता म्हणतो की, “माझ्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. टी-सीरिज आणि भूषण कुमार सर एका अदभूत सस्पेन्स थ्रिलरवर काम करत आहेत आणि मी याचा भाग होण्यासाठी खूप उत्साही आहे. मी या प्रोजेक्टचे शूटिंगही सुरू केले आहे.” या चित्रपटात दर्शन व्यतिरिक्त आर माधवन, अपारशक्ती खुराना आणि इतर अनेक प्रतिभावान कलाकारांच्या भूमिका आहेत. टी-सिरीजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांची बहीण खुशाली कुमार या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण करतेय. या चित्रपटाचं नाव अजून ठरायचं असून हल्लीच्या शिरस्त्याप्रमाणे अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत.
“जेव्हा आपण एखाद्या चांगल्या स्क्रिप्टवर काम करत असतो तेव्हा खूप चांगले वाटत असते आणि जेव्हा त्यासोबत उत्कृष्ट सह-कलाकार असतात तेव्हा हा अनुभव आणखी समृद्ध करणारा असतो. माधवन हा आमच्या इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे आहे, जो नेहमी ‘आउट ऑफ द बॉक्स’ भूमिका करीत असतो. अशा तळमळीच्या अभिनेत्याबरोबर ‘फ्रेम’ सामायिक करण्यास मला खरोखर आनंद होत आहे. मी एक उत्तम अभिनेता असलेल्या अपारशक्ती खुरानाबरोबर काम करण्याचीही उत्सुकतेने वाट पाहात आहे. मी पहिल्यांदा खुशाली कुमारसोबत काही सीन्स शूट केले. ती एक उस्फुर्त व गुणी अभिनेत्री आहे आणि स्वतःच्या व सहकलाकारांच्या कामाबद्दल खरोखर उत्कट आहे, ”असं दर्शन कुमार म्हणाला.