मुंबई - हिंदी आणि हॉलिवूड चित्रपटांचे लोकप्रिय समीक्षक राजीव मसंद यांना कोरोनाची बाधा झाली आहे. काही दिवसापूर्वीच त्यांची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना अंधेरी, मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार राजीव मसंद यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून अद्यापही त्यांची प्रकृती गंभीर आहे. गेली २५ वर्षे चित्रपटांचे समीक्षण करणारे मसंद हे ४२ वर्षांचे आहेत.
फुफुसांमध्ये इन्फेक्शन वाढल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या बद्दल ज्या बातम्या झळकत आहेत त्यानुसार ते सध्या व्हेंटिलेटरवर असून सिनेजगतात काळजीचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच राजीव मसंदयांनी आपल्या पत्रकारितेला बाजूला ठेवत करण जोहर आणि बंटी सजदेह यांची नवीन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी 'धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी' (डीसीए)चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.
राजीव मसंद यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पत्रकारितेची सुरूवात 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राने केली होती. पुढे त्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ मध्ये चित्रपट पत्रकार म्हणूनही काही वर्षे काम केले. यानंतर राजीव हिंदी फिल्म न्यूज चॅनल स्टार न्यूज (आता एबीपी न्यूज) मध्ये काही वर्षे चित्रपट समीक्षक आणि पत्रकार म्हणून काम केले. 'स्टार न्यूज'मध्ये ते चित्रपटांशी संबंधित 'मसंद की पसंद' हा शो करीत असत.
हेही वाचा - राधे’मधील ‘दिल दे दिया’ची गायिका पायल देवला झालाय दुहेरी आनंद!