मुंबई - सुपरस्टार शाहरुख खानचा आगामी चित्रपट लांबणीवर पडला आहे. दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदसोबत त्याने चित्रपटात काम करण्याची तयारी केली होती. मात्र सध्या देशाला कोरोना व्हायरसने संकटात टाकले आहे. त्यामुळे हा चित्रपट आता लांबणीवर पडला आहे.
यशराज फिल्मचा हा महत्त्वकांक्षी चित्रपट आहे. यशराज फिल्म्सचे हे ५० वे वर्ष आहे. या चित्रपटाची घोषणा एप्रिलमध्ये केली जाणार होती.
करोना व्हायरसमुळे चित्रपटाला स्थगिती दिली गेली असली तरी या महिन्यात या चित्रपटाबद्दलचा प्लॅन घोषित केला जाऊ शकतो.
सिध्दार्थ आनंदच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट जगातील सुंदर आणि अनोळख्या ठिकाणी शूट होणार होता. मात्र सध्या परदेशात जाण्यावर बंधने असल्यामुळे या चित्रपटाची योजना सध्यातरी लांबणीवर पडली आहे.
शाहरुख खान आगामी दोन दिग्दर्शकांसोबत काम करीत असणार असल्याचे समजते त्यात एक सिध्दार्थ आनंद आहे तर दुसरे राजकुमार हिराणी आहेत. शाहरुखचे फॅन त्याच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत गेली दोन वर्षे आहेत. झिरो चित्रपटाला मिळालेल्या अपयशानंतर त्याने एकाही चित्रपटाची घोषणा केलेली नाही.