मुंबई - सोशल माध्यमांवर जातीवाचक पोस्ट करण्याच्या संदर्भात वांद्रे न्यायालयाने अभिनेत्री कंगना रणौत हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर याचिकाकर्ते मुनावर अली यांच्याकडून वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंगना रणौतवर 153(a) 295(a) व 124(a) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिची बहीण रंगोली चंदेल हिच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता लवकरच कंगना व तिची बहीण रंगोली याची पोलीस चौकशी करणार आहेत.
अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात वाद निर्माण केल्याची याचिका दाखल झाली होती. सामाजिक द्वेष वाढल्याचा आरोप करत याचिकाकर्ते मुनवर अली ऊर्फ साहिल यांनी वांद्रे न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळेस याचिकाकर्त्याने कंगना रणौत हिच्या सोशल माध्यमांवर तिने केलेल्या वादग्रस्त पोस्टसंदर्भात माहिती दिली. यावर वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना रणौतच्याविरोधात एफआयआर करण्याचे आदेश दिले होते.
या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी कंगना रणौत हिने नजीकच्या काळात तिच्या सोशल माध्यमांवर बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल केलेले ट्विट व पोस्ट सादर केले. बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लीम असे गट असून मी एका मुस्लीमबहुल क्षेत्रात स्वतःचे नाव मोठे केले असल्याचे कंगनाने या पोस्टमध्ये म्हटले होते. यावर बॉलीवूड चित्रपटांमध्ये कास्टिंग डायरेक्टरचे काम करणाऱ्या मुनवर अली यांनी वांद्रे न्यायालयामध्ये याचिका दाखल करीत यासंदर्भात कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. बॉलिवूडचा जातीपातीशी काही घेणेदेणे नसल्याचा याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे.
न्यायालयाकडे सादर करण्यात आलेले व्हिडीओ पाहिल्यानंतर न्यायालयाने याची दखल घेत, यासंदर्भात मुंबई पोलिसांना कंगनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्यावतीने वांद्रे पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून आता कंगना आणि तिची बहिण रंगोलीला चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.