मुंबई - बॉलीवुड अभिनेता सलमान खानचे घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधील एका सोळा वर्षीय मुलाने वांद्रा पोलिसांना ई मेल करून ही धमकी दिली. या नंतर पोलिसांनी तत्काळ सलमान खानच्या निवासस्थानी धाव घेतली.
वांद्रा येथे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खानचे घर आहे. 'पुढील दोन तासांच्या आत सलमानच्या घरात बॉम्ब स्फोट होईल, थांबवता येत असेल तर थांबवा', असा धमकीचा ई मेल वांद्रा पोलिसांना या सोळा वर्षीय मुलाने पाठवला. या नंतर लगेच अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. मनोज कुमार शर्मा यांनी कर्मचाऱ्यांसह सलमानचे घर गाठले. बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले.
हा प्रकार घडला तेव्हा सलमान घरी नव्हता. पोलिसांनी त्याचे आई-वडील आणि बहिण अर्पिता यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर संपूर्ण घराची तपासणी करण्यात आली.