नवी दिल्ली - माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर केवळ राजकीयच नव्हे, तर जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. बॉलीवूडकरांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर भावना व्यक्त केल्या आहेत.
लता मंगेशकर
सुषमाजी यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून फार मोठा धक्का बसला आहे. एक संवेदनशील आणि निस्वार्थ नेत्या म्हणून त्या नेहमीच स्मरणात राहतील. संगीत आणि कवितेची त्यांना विशेष समज होती. माझी मैत्रीण आणि माजी परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची सदैव आठवण येत राहिल.
जावेद अख्तर, गीतकार
गीतकार जावेद अख्तर यांनी ट्वीट केले की, "सुषमा जी यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. लोकसभेत संगीत बिरादरीचा तु्म्ही नेहमीच उत्कृष्टरीत्या बचाव केला. त्यामुळे आम्ही नेहमीच तुमचे ऋणी राहू. तसेच, तुम्ही एक अद्भुत व्यक्ती म्हणून नेहमीच स्मरणात रहाल.
शबाना आझमी, चित्रपट कलाकार
शबाना आझमी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "सुषमाजी यांच्या निधनाबद्दल अतिशय दुःखद झाले आहे. भिन्न राजकीय विचारसरणी असूनही आमच्यात चांगली मैत्री होती. मी त्यांची नवरत्न आहे. असे त्यांनी त्यांच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या कार्यकाळात मला म्हटले होते. तसेच, त्यांनी चित्रपटांना एक उद्योगाचा दर्जा देखील मिळवून दिला. त्या एक चपळ आणि मनमोकळ्या व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. "
सनी देओल, अभिनेता, खासदार
अभिनेता आणि भाजपचे खासदार सनी देओल यांनी ट्वीट मध्ये म्हटले की, "सुषमा जी यांच्या निधनाबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. त्या आपल्या देशातील एक उत्तम नेत्या म्हणून नेहमीच त्यांच्या स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख पचवण्याची ताकद मिळो अशी प्रार्थना करतो.
रितेश देशमुख, अभिनेता
रितेश देशमुखने ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, सुषमाजी तुम्ही नेहमीच तेजोमय असाल, आम्हाला तुमची सदैव आठवण येत राहील. महिला शक्ती.. तुमच्या आत्म्याला शांती लाभो.."
स्वरा भास्कर, अभिनेत्री
स्वरा भास्कर ट्विटमध्ये म्हणाली की, माझे आणि त्यांचे वैचारिक मतभेद होते. मात्र, मी त्यांच्या संकल्पांची आणि त्यांच्या उल्लेखनीय कामांची खूप मोठी प्रशंसक आहे. त्या हुशार संसद सदस्य, मानवतावादी, लोकशाहीच्या प्रति वचनबद्ध आणि प्रेरणादायक व्यक्तीमत्व होत्या.
हंसराज हंस
सुषमा स्वराज यांच्या अचनानक निधनाचे वृत्त ऐकून वाईट वाटले. त्यांची अनुस्थिती नेहमीच जाणवत राहिल. त्या खुप खास आणि सर्वसामान्यांच्या नेत्या होत्या.
बोमन इराणी
सुषमा स्वराज यांच्या अकाली जाण्याने देशाची खुप मोठी हानी झाला आहे. त्या निसर्गाचे वरदान होत्या.
मधुर भांडारकर
"सुषमाजी यांच्या अकाली जाण्याने धक्का बसला आहे. त्या एक अतिशय सभ्य आणि हुशार महिला खासदार होत्या. परराष्ट्रमंत्र्याच्या कारकीर्दीत त्यांनी उत्तम काम केले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रति मी संवेदना व्यक्त करतो."
अदनान सामी
सुषमाजी यांच्या आकस्मिक निधनाची दु:खद बातमी ऐकून माझ्यासह माझ्या कुटूंबाला फार मोठा धक्का बसला आहे. त्या आमच्या सर्वांसाठी आईसमान होत्या. त्या उत्तम वक्ता आणि आदरणीय नेत्या तर होत्याच शिवाय एक प्रेमळ, सर्वांची काळजी घेणाऱ्या अन् मायेची उब देणाऱ्या आदरणीय व्यक्ती होत्या. त्यांची खूप आठवण येईल.