मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी वांद्रे पोलीस चौकशी करीत आहेत. सुशांतच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे का? याची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत. आता या प्रकरणामध्ये निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही चौकशी केली जाणार आहे. पुढील दोन दिवसात पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचा समन्स संजय लीला भन्साळी यांना बजावण्यात आला आहे.
संजय लीला भन्साळींच्या चित्रपटासाठी सुशांतसिंह राजपूतला दोनदा ऑफर मिळाली होती. मात्र त्याला काम करण्याची संधी मिळाली नव्हती. संजय लीला भंसाली यांचा सुपरहिट चित्रपट 'गोलियों की रासलीला राम-लीला'साठी सुशांतला ऑफर होती. मात्र त्याच्या जागी रणवीर सिंगला ही भूमिका मिळाली होती. त्यावेळी सुशांतकेडे यशराज फिल्म्सचा चित्रपट असल्यामुळे ही त्याची संधी गेल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' सिनेमातही त्याला ऑफर मिळाली होती मात्र काम मिळाले नव्हते. यावेळी देखील सुशांतच्या हातामध्ये यशराजचा 'पानी' हा चित्रपट होता.
मोठ्या बॅनरच्या चित्रपटातून सुशांतसिंह राजपूतला काम का मिळाले नव्हते याची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत. याचाच भाग म्हणून मोठ्या बॅनरच्या निर्मात्यांची चौकशी सुरू आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर सांगितले जात आहे की त्याचे फिल्म करियर फारसे चांगले सुरू नव्हते. त्याला ऑफर मिळायच्या मात्र नंतर त्याला सिनेमातून काढून टाकले जायचे. इतकेच नाही तर यशराज फिल्म्सच्या 'पानी' चित्रपटासाठी सुशांतने ७ महिने ट्रेनिंग आणि वर्कशॉप केले होते. तरीही त्याला हा चित्रपट मिळाला नव्हता.
सुशांतसिंहच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील घराणेशाही जबाबदार असल्याची तक्रार मुझफ्फरनगरमध्ये न्यायालयात दाखल झाली आहे. या तक्रारीध्ये अभिनेता सलमान खान, निर्माता संजय लीला भंसाली, आदित्य चोपड़ा, करण जौहर, साजिद नाडियावाल, एकता कपूर, भूषण कुमार आणि दिनेश विजान यांच्या नावाचा समावेश आहे. ३ जुलै रोजी याची सुनावणी होणार आहे.