मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून आपल्या 'सडक २' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. अशात आता या चित्रपटाबद्दलचं आणखी एक वृत्त समोर आलं आहे. बंगाली अभिनेता जीशू सेनगुप्ता या सिनेमात आलियाची वडिलांची भूमिका साकारणार आहे.
ऑनस्क्रीन बाप-लेकीच्या भूमिकेत झळकणारी ही जोडी सध्या उटीमध्ये या सिनेमाचं शूटींग करत आहे. आलियासोबतच्या कामाचा अनुभव सांगताना जीशू दासगुप्तानं तिचं कौतुक केलं आहे. आलियाची आपल्या कामाप्रती असणारी निष्ठा कौतुकास्पद आहे. तिचं मन नेहमी कामात असतं आणि सध्या ती भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्तम कलाकार असल्याचं जीशूनं म्हटलं आहे.
दरम्यान महेश भट्ट यांचं दिग्दर्शन असलेल्या 'सडक २' चित्रपटात संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि पूजा भट्ट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा १९९१ साली आलेल्या 'सडक' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी १० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.