मुंबई - विकी डोनर फेम अभिनेता आयुष्मान खुराणा आणि यामी गौतम हे दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. बाला या चित्रपटात ही जोडी झळकणार आहे. तर या दोघांशिवाय चित्रपटात भूमी पेडणेकरही मुख्य भूमिकेत झळकणार असून आयुष्मानसोबतचा हा तिचा तिसरा चित्रपट असणार आहे.
चित्रपटात या त्रिकूटाशिवाय सौरभ शुक्ला, जावेद जाफरी आणि सीमा पहवा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. आजपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे.
याशिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये २२ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अमर कौशिक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून दिनेश विजन यांची निर्मिती असणार आहे.