हैदराबाद - दाक्षिणात्य सिनेस्टार प्रभासचा 'बाहुबली - द कन्क्लुजन' या चित्रपटाला आज ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. बाहुबलीचा पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर बाहुबली २ चित्रपटानेही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही बरेच विक्रम रचले आहेत. देशातच नाही तर जगभरात प्रभासच्या या चित्रपटाने छाप सोडली. एस. एस. राजामौली यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातील सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. या चित्रपटाला ३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
प्रभासच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट ठरला तो म्हणजे 'बाहुबली'. या चित्रपटात त्याने साकारलेल्या बाहुबलीच्या भूमिकेमुळे तो बाहुबली याच नावाने ओळखला जातो. त्याने या चित्रपटापूर्वी देखील बरेच सुपरहिट चित्रपट दिले होते. मात्र त्याला खरी ओळख ही बाहुबलीनेच मिळवून दिली. प्रभासने या चित्रपटाची आठवण शेअर करत हा चित्रपट माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अविस्मरणीय चित्रपट आहे.
प्रभासने आपल्या पोस्टमध्ये चाहत्यांचेही आभार मानले आहेत. तसेच, त्याने काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'बाहुबली - द बिगीनिंग' हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. तेलुगू भाषेसह हिंदीमध्ये देखील हा चित्रपट सिनेमागृहात झळकला होता. त्यानंतर 'कट्टपाने बाहुबलीला का मारले', हा प्रश्न सोशल मीडियावर तुफान ट्रेण्ड झाला होता. नंतर २०१७ साली 'बाहुबली - द कन्क्लुजन' चित्रपटात नेटकऱ्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पहिल्या भागाप्रमाणेच नेटकऱ्यांनी दुसऱ्या भागालाही भरभरुन प्रतिसाद दिला.
दोन्हीही चित्रपटाची निर्मिती शोभू यार्लगड्डा आणि प्रसाद देवीनेगी यांनी केली होती. तर, हिंदी वितरणासाठी करण जोहर देखील या चित्रपटाशी जोडला गेला होता.
प्रभाससह राणा दगुबत्ती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, राम्या क्रिश्नन, सत्यराज यांच्याही भूमिका या चित्रपटात पाहायला मिळाल्या. राणा दगुबत्तीने साकारलेली 'भल्लादेव' ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.