मुंबई- लेखक, दिग्दर्शक अनुभव सिन्हा त्याच्या प्रभावशाली कथानकाबद्दल जाणला जातो. त्याने तापसी पन्नूला घेऊन केलेला ‘थप्पड’ चांगलाच गाजला व बॉक्स ऑफिसवरसुद्धा कमाई केली. सामाजिक समस्यांबद्दल परखडपणे बोलणाऱ्यांपैकी एक असलेल्या दिग्दर्शक अनुभव सिन्हाने आयुष्मान खुराना सोबत बनवलेल्या ‘आर्टिकल १५’ ची समीक्षकांकडून खूप स्तुती झाली. आता हीच दिग्दर्शक-अभिनेता जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहेत. त्यांनी आपल्या आगामी चित्रपट अनेकची घोषणा केली आहे. या चित्रपटातील आपल्या लूकचा फोटो आयुष्यमानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
भारताच्या ईशान्य प्रांतात चित्रिकरणाला सुरुवात
अनुभव सिन्हाचा ‘अनेक’ मध्ये राजकीय नाट्य असून तो ॲक्शन थ्रिलर असणार असल्याचे म्हणटले जात आहे. या चित्रपटातील कथानक व कलाकार याबाबत गुप्तता बाळगली असून बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. भारताच्या ईशान्य प्रांतात याचे चित्रीकरण सुरु झाले असून त्याआधी आयुष्मान ने काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली होती. अनुभव आणि आयुष्मान या दोघांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या ‘क्लॅप-बोर्ड’ चा एक फोटो शेअर केला असून त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह आणखी वाढला आहे.
सर्वात महागडा चित्रपट
‘अनेक’ चित्रपटामध्ये आयुष्मान ‘जोशुआ’ नावाची व्यक्तिरेखा साकारतोय व तो एकदम वेगळ्याच आणि कणखर लूक मध्ये दिसतोय. सूत्रांकडून सांगण्यात आले आहे की, हा अनुभव सिन्हाचा सर्वात महागडा सिनेमा असेल. ‘अनेक’ या चित्रपटाची, अनुभव सिन्हा दिग्दर्शनाबरोबरच, निर्मितीही आपले बॅनर बनारस मिडिया वर्क्स खाली करत असून भूषण कुमार यांचे टी-सिरीज बॅनरही या चित्रपटासोबत जोडले गेलेले आहे. ‘मुल्क’, ‘आर्टिकल १५’, ‘थप्पड’ सारख्या ‘बॅक टू-बॅक’, समीक्षकाद्वारे प्रशंसनीय, यशस्वी चित्रपटांनंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हा ‘अनेक’ मधून आयुष्मानसोबत अजून एक सामाजिक बांधिलकी जपणारा चित्रपट देणार असा विश्वास व्यक्त केला जातोय.