बेळगाव - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. बेळगावमध्ये कंगनाविरोधात तक्रार दाखल झाली आहे. पेशाने वकील असलेले हर्षवर्धन पाटील यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. द्वेष पसरवल्याबद्दल आणि शेतकऱ्यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्यावरून त्यांनी ही तक्रार दाखल केली. कंगनाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर बंदी घालवी, ही मागणीही त्यांनी केली.
हर्षवर्धन पाटील यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले आहे. तर तपासणीनंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हर्षवर्धन यांनी पोलिसांना आयपीसी कलम 153, 153 (ए) 503, 504, 505 (1), 505 (बी), 505 (सी), 505 (2), 506 अंतर्गत 24 तासांच्या आत तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांचा दहशतवादी उल्लेख -
केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागच्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून आंदोलन करत आहेत. पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला दिलेल्या जाहीर पाठिंब्यानंतर संपूर्ण जगातून त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. रिहानाच्या ट्विटला प्रतिउत्तर देत कंगना रणौतने तिला चांगलंच धारेवर धरलं होतं. तिने आपल्या ट्विटमध्ये दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी नसून दहशतवादी आहेत, असं म्हटलं होतं. शेतकऱ्यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्यानंतर तीच्यावर अनेकांनी टीका केली आहे.