मुंबई - सैफ अली खान आणि अमृता सिंग विभक्त राहात असले तरी त्यांच्यातील मैत्री शाबूत आहे. सैफने करिनासोबत विवाह केला असला तरी त्याच्या मुलाखतीत तो नेहमी अमृताची आठवण काढीत असतो. अलिकडेच त्याने दिलेल्या मुलाखतीत त्याने अमृताचे तोंडभरून कौतुक केले आहे.
सैफ अली खानने आपल्या करियर आणि खासगी गोष्टींबद्दल उघडपणे सांगितले. आपल्या पूर्व पत्नी अमृताबद्दल बोलताना तो म्हणाला, ''मी घरातून पळून गेलो होतो आणि मी २० व्या वर्षी लग्न केले होते. या सर्वाचं श्रेय माझी एक्स वाईफ अमृताला द्यावं लागेल कारण तिने माझे कुटुंब, काम, व्यवसाय याकडे मला गंभीरतेने पाहायला शिकवले. एखादी गोष्ट साध्य करताना तुम्ही त्याकडे पाहून हसत असाल तर ती गोष्ट कधीच साध्य करु शकत नाही.''
सैफ अली खानने १९९९ मध्ये आपल्याहून १२ वर्षे मोठी असलेल्या अमृता सिंगसोबत विवाह केला होता. लग्नाच्यावेळी सैफ केवळ २० वर्षांचा होता. त्यांचे लग्न हिंदू आणि मुस्लिम परंपरेनुसार झाले होते. आपल्या करियरच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या अमृताने लग्नानंतर बॉलिवूडपासून स्वतःला दूर केले होते.
सैफ आणि अमृताचा संसार १३ वर्षे सुखाचा झाला. त्यानंतर दोघे विभक्त झाले. त्यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. सैफचा आपल्या मुलांशी चांगला संपर्क आणि नाते आहे.