मुंबई - सुपरस्टार अक्षय कुमार मदतीसाठी नेहमीच पुढे असतो. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी त्याने भरीव स्वरुपाची मदत यापूर्वीच केली आहे. आता त्याने १००० पोलिसांना रिस्ट बँड दिले आहेत. या बँड मुळे कोरोनाची लक्षणे तातडीने पोलिसांच्या लक्षात येतील.
या रिस्ट बँड कंपनीचा अक्षयकुमार ब्रँड अम्बॅसेडर आहे. हा बँड घड्याळाप्रमाणे मनगटावर बांधता येतो. याचा सेन्सर शरिराचे तापमान, ह्रदयाचे ठोके, ब्लड प्रेशर यासोबतच पावलांची संख्या आणि कॅलरीजवरही लक्ष ठेवतो. यामुळे कोरोनाची लक्षणे ओळखणे सोपे होते.
कंपनीने ट्विटरवर याची माहिती देताना अक्षयचे आभार मानले आहेत.
यापूर्वी अक्षयने मुंबई पोलीस फाऊंडेशनला देणगी दिली आहे. पंतप्रधान निधीसाठीही २५ कोटींची मदत अक्षयने केली होती. त्यासोबतच पीपीई किट्स, गरिबांना जेवण अशी मदत तो करीत आला आहे.
व्यावसायिक पातळीवर अक्षयच्या खात्यामध्ये अनेक चित्रपट आहेत. तो 'अतरंगी रे', 'लक्ष्मी बॉम्ब', 'पृथ्वीराज' आणि 'बच्चन पांडे' या चित्रपटातून झळकणार आहे.