'तान्हाजी दि अनसंग वोरियर' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या सिनेमातील काही सीन्सवर राष्ट्रवादी काँगेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि संभाजी ब्रिगेड यांनी काही आक्षेप घेतले आहेत. मात्र काल झालेल्या पत्रकार परिषदेत सिनेमातील मुख्य अभिनेता आणि निर्माता अजय देवगण आणि सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपलं म्हणणं मांडलं होतं.
अजय देवगण यांच्या करिअरमधील हा 100 वा सिनेमा असल्याने त्यात चांगली भूमिका करण्यासोबतच ऐतिहासिक बाबतीत कोणतीही चूक राहू नये यासाठी जास्त प्रयत्न केल्याचं त्याने कालच स्पष्ट केलं होतं. सिनेमात दाखवलेली प्रत्येक गोष्ट ही ऐतिहासिक तथ्य पडताळून मगच प्रेक्षकांसमोर आणली असल्याच त्याने सांगितलं. त्यासोबतच सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत यानेही या सिनेमावर लेखक प्रकाश कपाडिया यांनी भरपूर मेहनत घेतली होती. तसच अनेक पुस्तकं आणि अनेक ऐतिहासिक चित्र यांची सांगड घालून मगच हा सिनेमा तयार केलेला असल्याने त्यातून कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली होती.
स्वराज्याचे सुभेदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र तान्हाजी मालुसरे याची जीवनगाथा मांडनाऱ्या या थ्रीडी सिनेमात काही सीन्स आक्षेपार्ह असून त्यात बदल करण्याची मागणी वाढू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना लाकूड फेकून मारणारी व्यक्ती कोण, तसच तान्हाजी मालूसरे यांनी सोवळं आणि रुद्राक्षाची माळ परिधान केली आहे. त्यामुळे या सिनेमाद्वारे
ब्राम्हण समाजाचे तुष्टीकरण होत असल्याच मत या संघटनांनी व्यक्त केलं आहे. मात्र कुणालाच दुखवण्याचा आपला उद्देश नसल्याचं स्पष्टीकरण कालच अजय देवगण आणि ओम राऊत यांनी दिल होत.
याशिवाय या सिनेमात खरच काही आक्षेपार्ह वाटल्यास त्यात निर्माते अजय देवगण याच म्हणणं लक्षात घेऊन नक्की बदल करू अस दिग्दर्शक ओम राऊत यांनी ई टीव्ही भारतशी फोनवर बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता तरी आक्षेपाच्या तलवारी म्यान होणार का..?? आणि ही नरवीर तान्हाजी मालुसरे यांची कथा मोठ्या पडद्यावर येणार का ते लवकरच कळेल.