मुंबई - बॉलिवूडची सुंदरी, अशी ओळख असणाऱ्या ऐश्वर्याला आजपर्यंत प्रेक्षकांनी केवळ मुख्य अभिनेत्री आणि एका उत्तम व्यक्तिमत्वाच्या रूपातच पडद्यावर पाहिलं आहे. मात्र, आता तिच्या चाहत्यांना तिचं एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटात ती निगेटीव्ह रोल साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.
हा चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन' या तामिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटातून चोल साम्राज्यावर भाष्य केलं जाणार आहे. चित्रपटात ऐश्वर्या नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. नंदिनीने चोल साम्राज्याच्या खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळली होती.
विशेष म्हणजे ऐश्वर्यानं मणिरत्नम यांच्याच 'इरूवर' चित्रपटातून १९९७ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ऐश्वर्याने याआधीही काही चित्रपटांत खलनायिकेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे, या भूमिकेतील तिचा कमबॅक तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच खास असणार आहे.