मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या अनेक नव्या स्टारकिड्सची एन्ट्री होताना दिसत आहे. सारा अली खान, अनन्या पांडे आणि प्रनूतन बहलच्या पाठोपाठ आता लवकरच तारा सुतारिया आणि सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीही बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत.
तारा सुतारिया 'स्टुडंट ऑफ द ईअर २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय तारा आणि अहान ही नवोदित जोडी आगामी चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याची अधिकृत घोषणाही आता करण्यात आली आहे. हा चित्रपट 'RX 100' या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे.
मिलन लुथरिया यांनी या तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर साजिद नाडियाडवाला हिंदी व्हर्जनचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे शीर्षकही अद्याप गुलदस्त्यातच आहे. अहानने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती देत या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे म्हटले आहे.