मुंबई - देशाने हळूहळू लॉकडाउन अनलॉक करण्यास सुरवात केली आहे, त्यामुळे दीपिका पादुकोणसुद्धा इतर कलाकारांप्रमाणेच 'न्यू नॉर्मल' स्वीकारून कामाला सुरुवात करणार आहे. यासाठी आवश्यक ती सारी खबरदारी घेत ती तिच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. चित्रपटांसोबतच दीपिका बर्याच नामांकित ब्रॅण्ड्ससोबत वर्षानुवर्षे करारबद्ध असून लॉकडाऊनमध्ये दीपिकाने आणखी एका मोठ्या ब्रँडसोबत करार केला आहे.
शकुन बत्राच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी दीपिका लवकरच गोव्याला रवाना होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्यापूर्वी ती “कोविड -१९ मुळे अडकलेल्या ब्रँडच्या कमिटमेंट्स पूर्ण करण्याला प्राध्यान्य देणार आहे. दीपिकाने सुरुवातीचे तीन दिवस यासाठी राखीव ठेवले आहेत. जेव्हा अभिनेत्री तिच्या चित्रपटाचे शूटिंग सुरूवात करेल, तेव्हा तिला यासाठी वेळ मिळणार नाही आणि म्हणूनच या सगळ्या कमिटमेंट्स सुरुवातीच्या दिवसात पूर्ण करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.
दीपिकाच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं तर तिच्याकडे दिग्दर्शक शकुन बत्राचा आगामी चित्रपट आहे. त्याच शुटिंग आता लवकरच गोव्यात सुरू होत आहे. याशिवाय 'इंटर्न' या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेकमध्ये ती काम करते आहे. याशिवाय तिच्या हातात प्रभाससोबतचा चित्रपट असून तो नाग अश्विन दिग्दर्शित करत आहे. हा सिनेमा पॅन इंडिया रिलीज होणारा एक बहुभाषिक सिनेमा असेल. यासोबतच 'द्रौपदी' या आणखी एका चित्रपटात देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.