रायगड - पावसाळा सुरू झाल्यामुळे येथील शेतकरी आता भात लावणी कामात गर्क झाला आहे. शेतात चांगल्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे आता लावणी कामाला जोर वाढला आहे. सुपरस्टार अभिनेता सलमान खान हा सुद्धा पनवेल येथील आपल्या फार्म हाऊस शेतात उतरून भात लावणीच्या कामात गुंतला आहे. याबाबत सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हातात भाताचे राब घेऊन उभा असलेला फोटो पोस्ट केला. तसेच त्याने या फोटोतून शेतकऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
अभिनेता सलमान खान याचा पनवेल येथे फार्म हाऊस आहे. याठिकाणी शेतजमीनही आहे. दरवर्षी सलमान खान हा आपल्या शेतात भात लावणी करीत असतो. कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने सलमान खान हा पनवेल फार्म हाऊसवर राहत आहे. त्याने कोरोना काळात गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटपही केले.
सलमान खानने आपल्या ट्विटर अकाउंटवर हातात राब घेऊन उभा असलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटो सोबत 'दाने दाने पे लिखा है, खाने वाले का नाम.....जय जवान जय किसान' असे कॅप्शन त्याने दिले. त्यामुळे शेतकरी राजा बाबत त्याने आपली भावना यातून व्यक्त केली.