सैफ अली खानचं आयुष्य हे कायमच निरनिराळ्या वादांनी आणि वादळांनी घेरलेलं आहे. त्यामुळे आपल्या खाजगी आयुष्यात त्याने घेतलेल्या निर्णयांबाबत तो नक्की काय स्पष्टीकरण देतो यामुळे या पुस्तकाची प्रकाशनापूर्वीच चर्चा रंगू लागली आहे.
सैफ हा मुळचा पतौडी खानदानाचा नवाब, त्याचे वडिल मन्सूर अली खान पतौडी उर्फ टायगर पतौडी हे मूळचे क्रिकेटर तर आई शर्मिला टागोर या अभिनेत्री त्यामुळे घरात दोन क्षेत्रातील दिग्गज असताना सैफने नक्की अभिनयाची निवड करिअर म्हणून का केली याबद्दल तो काही लिहिल का याची उत्सुकता आहे.
त्यानंतर वयाने फार मोठ्या असलेल्या अमृता सिंग हिच्याशी लग्न करण्याचा निर्णय त्याने का घेतला..? १९ वर्ष संसार करून सारा आणि इब्राहिम अशा दोन मुलांना जन्म देऊनही या दोघांमध्ये वादाची ठिणगी नक्की का पडली..? सैफ आणि अमृताने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सैफचं आयुष्य कसं होतं..? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सैफच्या आयुष्यात करिनाची एंट्री नक्की कशी झाली..? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं सैफच्या आत्मचरित्रात मिळतील का..? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
सैफचं वैयक्तिक आयुष्य जेवढं खळबळजनक आहे तेवढंच त्याचं सार्वजनिक आयुष्य देखील खलबळजनक आहे. हम साथ साथ है या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी सलमान खानसोबत केलेली हरणाची शिकार असो, किंवा ताज हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरून काही तरूणांशी केलेली मारहाण असो, पद्मश्री पुरस्कार जाहिर झाल्यानंतर झालेली टीका असो किंवा अगदी संगळं करिअर संपलं असं वाटत असतानाच केलेला कमबॅक असो अशा अनेक विषयांबाबत सैफ त्याची भूमिका नक्की कशी मांडतो याची त्याच्या फॅन्सना नक्कीच उत्सुकता असेल.
सैफ स्वतः एक उत्तम वाचक आहे. अनेक इंग्रजी पुस्तकं सैफने वाचलेली आहेत हीच वाचनाची आवड त्याने करिनाला देखील लावली. त्यामुळे आता सैफ स्वतः लेखन करण्याचा विचार करतोय त्यामुळे त्याचं पुस्तक नक्कीच दर्जेदार असेल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. गॉसिप कॉलममध्ये चघळल्या गेलेल्या किंवा सिनेमांमधून दिसलेल्या सैफची त्याच्या आत्मचरित्रातून काही वेगळी बाजू पहायला मिळते का ते हे पुस्तक आल्यावरच कळेल.