मुंबई - ड्रग प्रकरणात अटक झालेल्या अभिनेता अरमान कोहलीला आज न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयातून बाहेर निघताना अभिनेता अरमान म्हणाला की तो निर्दोष असून त्याच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. वेळ आल्यानंतर याविषयी प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासा करणार असल्याचेही तो म्हणाला.
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अभिनेता अरमान कोहली याला ड्रग बाळगल्याबद्दल रविवारी अटक केली होती. आज त्याला मुंबईच्या कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अरमानच्या घरावर एनसीबीने छापा टाकाला असता त्याच्या घरातून कोकेन सापडले होते.
अभिनेता अरमान कोहली याला एनडीपीएस कलम 21(ए), 27(ए), 28, 29,30 आणि 35 अंतर्गत कारवाई करण्यात आली व अटक झाली. ड्रग प्रकरणात सलग छापा टाकत असलेल्या एनसीबीच्या टीमने सोमवारी जुहू विभागामध्ये 2 ड्रग पेडलर्सना पकडले होते. त्यांच्या कडून टीमने एमडी ताब्यात घेतले होते. अरमान कोहलीला अटक झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. या दोन प्रकरणांचा संबंध एकमेकांशी असल्याचा तर्क करण्यात येत आहे.
मुंबईतील ड्रग प्रकरणी काही दिवसापूर्वी एनसीबीला मोठी माहिती मिळाली होती. त्यानंतर एनसीबीने रोलिंग थंडर नावाचे एक ऑपरेशन सुरू केले होते. अरमान कोहली वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे हे काही पहिले प्रकरण नाही. दारुच्या अधिक बाटल्या बाळगल्याच्या गुन्ह्याखाली अबकारी विभागाने कारवाई करीत अरमानला 2018 मध्ये अटक केली होती.
हेही वाचा - बदनामीचा खटला रद्द करण्यासाठी कंगणाची हायकोर्टात धाव!