मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून आमिर खानचे असिस्टंट म्हणून काम करत असलेल्या अमोस यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी वयाच्या 60 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. होली फैमिली रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमोस गेल्या 25 वर्षांपासून आमिरसाठी काम करत होते.
आमिर खानचे खास मित्र आणि लगान चित्रपटातील सहकलाकार करीम हाजी यांनी सांगितलं, की अमोस सकाळी अचानक जमीनीवर कोसळले. यानंतर आमिर खान आणि पत्नी किरण रावसह त्यांच्या टीमने अमोस यांना रुग्णालयात दाखल केले.
करीम यांनी सांगितलं, की अमोस सुपरस्टारसाठी काम करत होते. मात्र, ते खूपच साधे होते. ते प्रत्येकासोबतच खूप चांगलं वागायचे. ते मनाने खूप चांगले आणि मेहनती होते. पुढे करीम म्हणाले, की त्यांचे निधन आम्हा सर्वांसाठीच एक धक्का होता. कारण याआधी त्यांना काहीही आजार नव्हता आणि ते आजारीही नव्हते.
करीम म्हणाले, आमिरने आम्हाला एक संदेश पाठवला. यावेळी त्याने सांगितले, की अमोसची जागा कोणीही भरुन काढू शकत नाही. त्यांच्या निधनाने मला आणि किरणला मोठा धक्का बसला आहे. आम्ही त्यांना खूप मिस करु. करीमने सांगितले, की काही दिवसांपूर्वीच अमोस आजोबा झाले होते. त्यांच्या मृत्यूने आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे.