मुंबई - २०२० ची सुरूवात बॉलिवूडसाठी आश्वासक होती. १० जानेवारीला अजय देवगणचा तान्हाजी चित्रपट रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धमाका झाला. या चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा पार केल्यामुळे हे वर्ष सिनेसृष्टीसाठी फलदायी ठरणार असेच वाटत होते. वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारे १० चित्रपट निवडले तर त्यात तान्हाजी पहिल्या स्थानावर तर टायगर श्रॉफचा बागी ३ दुसऱ्या स्थानावर येतो, ज्यांची कमाई १०० कोटींच्या पार झाली होती. त्यानंतरच्या आठ चित्रपटांना हा जादुई आकडा गाठता आला नाही.
सर्वाधिक कमाई करणारे १० चित्रपट
तान्हाजी (₹३३७.६५ कोटी), बागी ३ (₹१३७.०५ कोटी), स्ट्रीट डान्सर थ्रीडी (₹९७ कोटी), शुभमंगल ज्यादा सावधान (₹८६.३९कोटी), मलंग (₹८४.५० कोटी), छपाक (₹५५.४४ कोटी), लव्ह आज कल (₹५२.६३ कोटी), जवानी जानेमन (₹४४.७७ कोटी), थप्पड (₹४४.५४ कोटी) आणि पंगा (₹४१.७१ कोटी) हे १० चित्रपट सर्वाधिक कमाई करणारे ठरले.
थिएटर्स बंद, शुटिंगही थांबले
मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची संकट जगभर पसरले. त्याच्या मोठा फटका चित्रपट उद्योगाला बसला. १७ मार्च २०२० नंतर थिएटर्स बंद झाली आणि बॉक्स ऑफिसही बंद झाले. इतकेच नाही तर १९ मार्चनंतर सर्व शुटिंगही बंद झाली आणि लाईट, कॅमेरा अँड अॅक्शनचा आवाज स्टुडिओत येणे बंद झाले.
नाईलाजाने ओटीटीवर रिलीज झाला अंग्रेजी मेडियम
जानेवारी ते मार्च या तीन महिन्याक काय ते बॉलिवूड चित्रपट रिलीज झाले. या तीन महिन्यात ३६ चित्रपट झळकले. मात्र अनेकांना तिकीट बारीवर प्रतिसाद मिळाला नाही तर काही प्रक्षकांनी आणि समीक्षकांनीही नाकारले. अंग्रेजी मेडियम हा इरफान खानचा शेवटचा चित्रपट १३ मार्च रोजी रिलीज झाला. त्यानंतर चारच दिवसात थिएटर बंद झाल्यामुळे हा चित्रपट प्रक्षकांना पाहता आला नाही. याचे पुन्हा प्रदर्शन करण्याचा विचार निर्मात्यांनी केला होता. अखेर हा चित्रपट नाईलाजाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला.
दिल बेचारा आणि गुलाबो सिताबोही ओटीटीवर रिलीज
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या शेवटच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून होते. या चित्रपटाची भरपूर चर्चा होती. त्याकाळात जर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला असता तर सुशांतच्या जाण्याने तयार झालेल्या सहानुभुतीचा फायदा कदाचीत झाला असता. मात्र हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. त्यासोबतच अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराणाची भूमिका असलेला बहुप्रतीक्षित गुलाबो सिताबो चित्रपटही अखेर ओटीटीवर रिलीज करण्यात आला.
ओटीटी प्लॅटफॉर्मला प्रेक्षकांची पसंती
लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांचे मनोरंजन टीव्ही करीत होता. जुन्या चित्रपटांसह काही जुन्हा मालिकाही टीव्हीवर झळकल्या. यात रामायण महाभारतपासून ब्योमकेश बक्षीपर्यंतचा समावेश होता. मात्र नवीन चित्रपट रिलीज होण्याची प्रतीक्षा थांबली होती. अशा वेळी निर्मात्यांना थिएटर्स उघडेपर्यंत थांबणे परवडणारे नव्हते. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या स्टार्सचे चित्रपट रिलीज व्हायला सुरूवात झाली.
ओटीटीवर रिलीज झालेले चित्रपट
ओटीटीवर रिलीज झालेल्या सिनेमांची यादी खूप मोठी आहे. यात बम्फाड, मिसेस सिरीयल किलर, व्हाट आर द ऑड्स, घुमकेतु, चिंटू का बर्थ डे, चोक्ड, कडक, बुलबुल, भोंसले, अनलॉक, व्हर्जिन भानुप्रिया, दिल बेचारा, यारा, शकुंतला देवी, लुटकेस, रात अकेली है, परीक्षा,गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल, खुदा हाफीज, मी रक्सम, क्लास ऑफ ८३, सडक २, राम सिंग चार्ली, अटकन चटकन, कार्गो, डॉली किट्टी और वो चमकते सितारे, लंडन कॉन्फीडेन्शल, हालहाल, खाली पीली, सिरीयस मेन, बहुत हुओ सन्मान, गिन्नी वेड्स सन्नी, कॉमेडी कपल, कसाई, तैश, पेपर चिकन, लक्ष्मी, लुडो, छलांग, दरबान या चित्रपटांचा समावेश आहे.
हेही वाचा - २०२०: रुपेरी पडद्यासह या जगाचा निरोप घेतलेले प्रतिभावंत कलाकार