वाराणसी : मानसिक तणावामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. मात्र दीर्घ मानसिक तणाव असलेल्या व्यक्तीमध्ये नपुंसकता निर्माण होत असल्याचा दावा बनारस हिंदू विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. पुरुषाची लैंगिक क्षमता ही एक जटिल न्यूरोएंडोक्राइन प्रक्रिया आहे. त्यामुळे ती प्रक्रिया पुरुषत्वात महत्त्वाचा घटक असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. या संशोधनामुळे मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
मानसिक तणावाचे नपुंसकत्वात महत्वाचे योगदान : पुरुषांमध्ये नपुंसकतेच्या जवळपास 50 टक्के प्रकरणात अनेक अज्ञात घटक कारणीभूत असतात. अलिकडच्या काळात जीवनशैलीतील बदल, मानसिक ताणतणाव, पोषण, आहार आणि चयापचय विकार हे नपुंसकत्वाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देत असल्याचे विविध वैज्ञानिक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मानसिक तणाव आणि नपुंसकत्व यांच्यातील संबंधांवर वर्षानुवर्षे चर्चा होत आहे. या विषयावर जगभरात अनेक संशोधन केले जात आहेत. यावर बनारस हिंदू विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्राध्यापक डॉ. राघव कुमार मिश्रा यांनी त्यांच्या संशोधक विद्यार्थी अनुपम यादव यांच्यासह हे संशोधन केले आहे. मानसशास्त्रीय तणावाचा पुरुषांच्या लैंगिक सामर्थ्यावर होणारा परिणाम आणि लिंगाच्या ताठरतेबाबत शरीरविज्ञानाचा अभ्यास केला आहे. या संशोधकांनी उंदरांवर केलेल्या संशोधनात प्रौढ उंदरांमध्ये मानसिक ताणतणावाची लक्षणे दिसून आल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. त्यामुळे पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर आणि इरेक्टाइल डिसफंक्शनवर परिणाम होऊ शकत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
पुरुषाच्या टेस्टोस्टेरॉनवर होतात प्रतिकूल परिणाम : या संशोधकांनी उंदरांना एक महिना दररोज दीड ते तीन तास दीर्घ मानसिक तणावाचा सामना करण्यासाठीचे उपाय केले. यातून उंदरांचे न्यूरोमोड्युलेटर, हार्मोन्स, लैंगिक क्षमता आणि लिंग ताठरता मार्करने मोजली. दीर्घ मानसिक तणाव गोनाडोट्रोपिनची पातळी कमी करते, तर तणाव कॉर्टिकोस्टेरॉनची पातळी वाढवते. त्याचा पुरुषाच्या टेस्टोस्टेरॉनवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. या अभ्यासामुळे मानसिक ताण आणि पुरुषाची लैंगिक शक्ती यासंबंधीच्या विश्लेषणाच्या नवीन क्षेत्रांचा मार्ग मोकळा होऊ शकत असल्याचा दावा या संशोधनाचे संशोधक डॉ. राघव कुमार मिश्रा यांनी केला आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष जागतिक स्तरावरील न्यूरो एंडोक्राइनोलॉजी या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
हेही वाचा - Toxic Chemicals In Paper Bags : कागदी पिशव्या, कंपोस्टेबल फूड पॅकेजमध्ये असतात विषारी रसायने