शिलाँग : मेघालयातील गुहेत बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यास संशोधकांना यश आले आहे. या संशोधकांनी मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यातील गुहेत बेडकाची नवीन प्रजाती शोधल्याची माहिती भास्कर सैकिया या संशोधकांनी मंगळवारी दिली आहे. याबाबतचे संशोधन एका आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. गुहेत बेडूक सापडण्याची ही दुसरी वेळ असून 2014 मध्ये तामिळनाडूमधील गुहेतून प्रथमच बेडकांचा शोध लागला होता, असेही या संशोधकांनी यावेळी सांगितले.
कॅस्केड रेनिड बेडकांची आहे नवीन प्रजाती : भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण कार्यालय आणि पुणे येथील झेडसीआय ( ZSI ) च्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनात संशोधकांनी दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यातील सिजू गुहेतील खोलवर कॅस्केड रेनिड बेडकांची एक नवीन प्रजाती शोधल्याची माहिती भास्कर सैकिया या संशोधकाने दिली आहे. सिजू गुहा ही 4 किमी लांबीची नैसर्गिक चुनखडीची गुहा आहे. कोविड 19 लॉकडाउनच्या काही महिन्यांपूर्वी जानेवारी 2020 मध्ये सुमारे 60 ते 100 मीटर खोलमधून हा बेडूक सापडल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या संशोधकांनी नवीन प्रजातीचे नाव अमोलोप्स सिजू असे ठेवले आहे. हे संशोधन इराणच्या जर्नल ऑफ अॅनिमल डायव्हर्सिटी या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
नवीन प्रजातीचा बेडूक गुहेतील कायमचा रहिवाशी नाही : नवीन प्रजातीतील बेडूक मॉर्फोलॉजिकलदृष्ट्या गूढ स्वरूपाचा आहे. त्यामुळे इतर कॅस्केड अमोलोप्स बेडकांच्या ज्ञात प्रजातींमधून त्यांची विशिष्ट ओळख तपासण्यासाठी नमुन्यांच्या ऊतींचे नमुन्यांचा आण्विक अभ्यास सुरू होता. मॉर्फोलॉजिकल, आण्विक आणि अवकाशीय डेटाच्या आधारे या संशोधकांनी सिजू गुहेतील बेडकाची ही जाती विज्ञानासाठी नवीन असल्याचे निष्कर्ष काढल्याची माहिती या संशोधकांनी दिली आहे. त्यामुळे नवीन प्रजातीचे नाव सिजूच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही संशोधक सैकिया यांनी स्पष्ट केले. गुहेचा संधीप्रकाश आणि गडद झोनपासून संशोधकांनी नमुने गोळा केले. यावेळी संशोधकांना कोणतेही ट्रोग्लोबिटिक बदल आढळले नाहीत. त्यामुळे हा बेडूक या गुहेचा कायमचा रहिवासी नसल्याचे स्पष्ट होत असल्याची माहितीही संशोधक सैकिया यांनी दिली.
संशोधकांनी शोधल्या तीन नव्या प्रजाती : प्राणीशास्त्रीय सर्वेक्षणानुसार 1922 पासून झेडएसआयने गुहेचे पहिले बायोस्पेलोलॉजिकल एक्सप्लोरेशन केले. तेव्हापासून सिजू गुहेत बेडकांची संख्या असल्याची माहिती संशोधकांना आहे. मात्र गुहेच्या अधिवासातील बेडकांच्या लोकसंख्येचा अहवाल पर्यावरणशास्त्रज्ञ किंवा जीवशास्त्रज्ञ लक्षात घेऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले. सिजू गुहेच्या जीवजंतू दस्तऐवजीकरणावरील संशोधन प्रकल्पाचा एक भाग होता. संशोधकांच्या टीममध्ये येथील झेडएसआय कार्यालयातील भास्कर सैकिया आणि डॉ बिक्रमजीत सिन्हा, पुण्याचे डॉ. के पी दिनेश आणि शबनम अन्सारी यांचाही समावेश आहे. या संशोधकांनी अरुणाचल प्रदेशमध्ये कॅस्केड बेडकाच्या आणखी तीन नवीन प्रजाती शोधल्या आहेत. त्यात अमोलोप्स चाणक्य, अमोलोप्स टेराओर्चीस आणि अमोलोप्स तवांग यांचा समावेश असल्याची माहिती डॉ. दिनेश यांनी दिली. ईशान्य भारतातील उभयचर प्राणी पूर्णपणे शोधलेले नाहीत. या जीवसृष्टी समृद्ध हॉटस्पॉटमधून अनेक नवीन प्रजाती शोधण्याची अधिक शक्यता असल्याची माहितीही डॉ. दिनेश यांनी दिली आहे.
हेही वाचा - ESA Spacecraft Finds Black Holes : युरोपियन स्पेस एजन्सीच्या शास्त्रज्ञांनी शोधले दोन कृष्णविवर