वॉशिंग्टन : सौरमालेतील लाल ग्रह मंगळावर उड्डाणाच्या चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या नासाचे इन्जेन्युईटी हे मार्स हेलिकॉप्टर मंगळावरील पहिल्या गोठविणाऱ्या रात्रीतून सुखरूपपणे बचावले आहे. उणे 90 अंश सेल्सिअस निचांकी तापमान असणाऱ्या गोठविणाऱ्या रात्रीत इन्जेन्युईटीवरील सर्व उपकरणे शाबूत राहिल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
उणे 90 अंश सेल्सिअस तापमानातही शाबूत
इन्जेन्युईटी मंगळावरील जेझेरो क्रेटरमध्ये उतरले आहे. नासाच्या प्रिझर्व्हन्स या रोव्हरच्या सहाय्याने इन्जेन्युईटीला तिथे ठेवण्यात आले आहे. या ठिकाणचे रात्रीचे तापमान उणे 90 अंश सेल्सिअस इतके निचांकी असते. या तापमानात इन्जेन्युईटीवरील इलेक्ट्रीक उपकरणे आणि बॅटरीला तडा जाण्याची शक्यता असते. मात्र यातून इन्जेन्युईटी बचावले असून लवकरच त्याची पहिली उड्डाण चाचणी केली जाणार आहे.
11 एप्रिलला उड्डाण करणार
येत्या 11 एप्रिल रोजी इन्जेन्युईटीची उड्डाण चाचणी केली जाणार असल्याचे या प्रकल्पाचे व्यवस्थापक मिमी आँग यांनी सांगितले. इन्जेन्युईटी प्रथमच मंगळाच्या पृष्ठभागावर एकटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रिझर्व्हन्सच्या पोटाला जोडण्यात आलेले इन्जेन्युईटी 3 एप्रिल रोजी जेझेरो क्रेटरमध्ये ठेवण्यात आले होते. गोठविणाऱ्या रात्रीतून सुखरूपपणे वाचणे हा इन्जेन्युईटीच्या प्रवासातील एक मैलाचा दगड असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 1.8 किलो वजनाचे हे हेलिकॉप्टर मंगळ किंवा दुसऱ्या ग्रहावर नियंत्रित उड्डाण करणारे पहिले हवाई वाहन ठरणार आहे.
उड्डाण करणे एवढीच इन्जेन्युईटीची मोहीम
इन्जेन्युईटीच्या पहिल्या उड्डाणासाठी आम्ही खूप उत्साही असल्याचे मिमी आँग यांनी म्हटले आहे. हेलिकॉप्टरचे सोलर पॅनल सूर्याच्या दिशेने रहावे तसेच त्याच्या रोटरपासून दूर राहण्यासाठी प्रिझर्व्हन्स इन्जेन्युईटीपासून अंतरावर असल्याचेही संशओधकांनी सांगितले. मंगळावर उड्डाण चाचणी करणे एवढीच इन्जेन्युईटीची मोहिम आहे. याला कोणतेही वैज्ञानिक उपकरणे जोडण्यात आलेली नाहीत.