हैदराबाद : दक्षिण पूर्व आशियात कोरोना विषाणू बाधित प्रकरणांची संख्या वाढत असताना, डब्ल्यूएचओने ‘पुरावा आधारित-माहिती देणारी कृती’ करण्याचे आणि सार्वजनिक आरोग्य व सामाजिक उपाययोजना करण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील साथीच्या रोगांच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यास राष्ट्रांना बजावले आहे.
“देशांचे संपूर्ण लक्ष कोविड १९च्या साथीवर केंद्रित होऊन हॉट स्पॉट्स आणि क्लस्टर्सचा शोध घेण्याबरोबरच बाधितांना विलगीकरण करण्यासाठी आणि त्यांची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी यंत्रणा उभारण्यावर व पूर्ण क्षमतेने प्रतिकार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे," डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागाच्या प्रांतीय संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी म्हटले आहे
चीनबाहेर कोविड-१९चा प्रसार झालेला दक्षिण पूर्व आशिया पहिला विभाग होता. १३ जानेवारी रोजी पहिल्यांदा थायलंडमध्ये कोविड १९चा रुग्ण आढळून आला होता. मात्र सोशल डिस्टंसिंग सहित इतर अनेक उपायांची कडक अंमलबजावणी केल्याने इतर देशांच्या तुलनेत कोविड रुग्णांची संख्या कमी राखण्यात या विभागाला मोठे यश आले असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. येत्या काही काळात होऊ घातलेल्या ७३व्या जागतिक आरोग्य सभेच्या पार्श्वभूमीवर ११ सदस्य देशांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत व्हर्च्युअल मिटिंग घेऊन आढावा घेण्याचे काम डॉ. सिंग यांनी केले आहे.
नव्याने सामान्य होण्याच्या दिशेने सामाजिक आणि आर्थिक जनजीवन पुन्हा पूर्ववत करताना देशातील सरकार आणि समाजाची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे सिंग म्हणाल्या. आतापर्यंत या विभागात १ लाख २२ हजार कोरोनाबाधित असून ४ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना बाधितांची प्रकरणे वाढत असून या विभागातील देश वेगवेगळ्या टप्प्यांमधून जात आहेत. अशावेळी टेस्टिंगची गती वाढविणे, विलगीकरण करणे, बाधितांची काळजी घेणे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे याच सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बाबी आहेत असे सिंग यांनी म्हटले आहे.
पुढे जाताना आपल्या या उपाययोजनांची गती वाढवावी लागणार आहे असे त्यांनी म्हटले आहे. आगामी काळात कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी आणि त्याला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्यसेवा मजबूत करणे आणि त्यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. तसेच आपण सर्वांनी परस्परांना सुरक्षित, निरोगी आणि चांगले राहण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असे क्षेत्रीय संचालकांनी म्हटले आहे.
सप्टेंबर २०१९मध्ये सदस्य देशांनी दक्षिण-पूर्व आशियाई प्रदेशात आपत्कालीन तयारीसंदर्भात दिल्ली जाहीरनाम्याची तत्वे स्वीकारली आहेत. जाहीरनामा घोषित होण्याची वेळ महत्त्वपूर्ण ठरली असून त्या दृष्टीने संपूर्ण प्रदेशात अंमलबजावणी होत असल्याचे क्षेत्रीय संचालकांनी म्हटले आहे.
घोषणापत्रात पुढील चार 'I/आय' चा समावेश करण्यात आला होता. १) आयडेंटिफाय रिस्क/जोखीम ओळखणे, २) इन्व्हेस्ट इन पीपल अँड सिस्टम फॉर रिस्क मॅनेजमेंट/जोखीम व्यवस्थापनासाठी लोक आणि प्रणालींमध्ये गुंतवणूक करणे, ३) इम्प्लिमेंट प्लँन्स/योजना अंमलात आणणे आणि ४) इंटर लिंक सेक्टर्स अँड नेटवर्क्स/आंतर-दुवा क्षेत्रे आणि नेटवर्क.
एकूण जागतिक लोकसंख्येच्या एक चतुर्थांश आणि त्या तुलनेत रोगांचे असमान प्रमाण असलेला हा प्रदेश आहे. लोकसंख्येची घनता, मोठ्या प्रमाणावरील शहरी झोपडपट्ट्या, स्थलांतरित गट, शारीरिक आणि सामाजिक अंतर राखण्यावर सामाजिक-आर्थिक घटकांचा प्रभाव आणि आवश्यक औषधे आणि वस्तूंच्या कमतरतेमुळे हा प्रदेश असुरक्षित बनला असल्याचे डॉ. सिंग म्हणाल्या. आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, यात कोणतेही दुमत नसल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.