पूर्व लडाखमधली परिस्थिती 100 दिवस उलटून गेल्यावरही आहे, तशीच आहे. भारताने वारंवार चीन लष्कराला सांगितले की, आता सैन्याने पूर्व स्थितीत यावे. तरीही चीन भारताच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. मुख्य सचिवालयातल्या सुरक्षा दलाच्या वक्तव्याने तर वास्तव समोर आले. त्यांनी संसदेच्या लोक लेखा समितीला सांगितले की, देशातली सशस्त्र सेना वास्तविक नियंत्रण रेषेवर ( एलएसी) कोणत्याही प्रकारच्या घटनांचा सामना करायला तयार आहे. ती दीर्घ काळ अगदी थंडीच्या दिवसातही तयार आहे.
लडाखमधला हिवाळा सैनिकांसाठी खूपच कठीण असतो. गोठवणारी परिस्थिती असते. त्यावेळी ऑक्सिजनची पातळी आपल्या शहरांतल्या ऑक्सिजनपेक्षा अर्धी असते. अगदी पाण्यासारखी मूलभूत गरजही भागवली जात नाही. सगळे काही गोठल्यामुळे पाणी मिळणेही दुरापास्त असते. पाच ते सहा महिने प्रत्येक हिवाळ्यात लडाखचा देशाशी संबंध तुटलेला असतो. कारण लडाखकडे जाणारे दोन रस्ते रोहतांग आणि झोजीला हे पूर्ण बर्फाच्छादित असतात.
हिवाळा हा सैनिकांची परीक्षा पाहणारा ठरतो. पण खरे आव्हान असते ते लष्करी नियोजन करणाऱ्यांसमोर. कारण ‘ रस्ता बंद ’ काळात लष्कराला सर्व सुविधांसह सज्ज राहावे लागते. दर वर्षी लष्कराला हा मोठा लॉजिस्टिक एक्झरसाइज करावा लागतो आणि याला ‘ अॅडव्हान्स विंटर स्टॉकिंग ’ ( एडब्लूएस ) म्हटले जाते. या काळात पुढच्या सहा महिन्यांमध्ये सैनिकांना आवश्यक असणाऱ्या प्रत्येक वस्तूची खरेदी आणि वाहतूक केली जाते. कारण नंतर लडाखला येणारे रस्तेच बंद होणार असतात.
अनेक महिने आधी ही तयारी सुरू होते. अगदी गरजेच्या छोट्या-छोट्या गोष्टींही मोजल्या जातात. टुथब्रशपासून कपड्यांपर्यंत, टिनमधले अन्न, रेशन, इंधन, औषधे, दारूगोळा, सिमेंट, तंबू इत्यादी गोष्टी आणल्या जातात. सीमा रस्ते संघटना लडाखला येणाऱ्या दोन रस्त्यांवर साचलेला बर्फ काढण्यात व्यग्र असली तरीही पठाणकोट आणि जम्मू इथून डेपोत वस्तू यायला लागतात. एकदा का रस्ते सुरू झाल्याची घोषणा झाली ( मेच्या आसपास ) की स्टोअर करायच्या वस्तू घेऊन पहिले वाहन लडाखला रवाना होते.
झोजी लावरून लेहला जाऊन परत यायला 10 दिवस लागतात आणि रोहतांग मार्गावरून 14 दिवस लागतात. दोन्ही रस्त्यांवर संक्रमण शिबिरे आहेत. तिथे ड्रायव्हर्स रात्री आरामासाठी थांबू शकतात. दोन आठवड्याच्या प्रवासात वाहनचालक वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीची विश्रांती घेतात. एक ट्रिप संपली की दुसरी सुरू होण्याआधी वाहनचालकाला दोन दिवस सुट्टी मिळते. पुढच्या सहा महिन्यांसाठी त्याच्यासाठी हे रुटिन असते. वाहनचालक एका हंगामात अतिशय खडतर रस्त्यावरून 10 हजार किमी. वाहन चालवतो. सैन्य वाहतूक ही भाड्याने घेतलेल्या स्थानिक ट्रक्स आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या इंधन टँकर्सद्वारे होते.
लडाखमध्ये साठवून ठेवण्याचे सर्व सामान आल्यावर लॉजिस्टिकल आव्हाने संपत नाहीत. सर्वात कठीण गोष्ट म्हणजे, हे सामान पुढच्या तळांवर पोचवणे. कारगीलमधली नियंत्रण रेषा आणि सियाचिन यांसारखे तळ हे वाहतुकीच्या रस्त्यांशी जोडलेले नाहीत. तळावर पोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात असलेल्या वस्तू या छोट्या पॅकेजमध्ये विभागाव्या लागतात आणि इंधन 20 लिटरच्या कॅन्समध्ये भरावे लागते. या साठवण्याच्या सर्व वस्तू अंतिम ठिकाणापर्यंत पोचवताना हजारो नागरी कर्मचारी आणि छोट्या घोड्यांची सेवा घेतली जाते. हे नागरिक आमच्या सैन्याची जीवनवाहिनी आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
लष्करी खेचरे देखील या सेवेत असतात आणि प्राणी वाहतूक चालक ( असे त्यांना संबोधले जाते ) जगातल्या कठीण भागात एका हंगामात 1000 किमी चालतात. उन्हाळ्यात सैनिकांसाठी राहण्याची ठिकाणे बांधायचे काम चालते. कारण हिवाळ्यात कसलेच बांधकाम होत नाही. यावेळी हे मोठे आव्हान असेल. कारण अतिरिक्त सैन्य लडाखमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे शून्यापेक्षा कमी तापमानात संरक्षण देतील अशी बांधकामे वेळेत करणे हे मोठे आव्हान आहे.
फक्त वस्तूच नाही तर माणसांनाही हलवले जाते. उन्हाळ्यात जवळजवळ 2 लाख माणसे लडाखमधून बाहेर पडताना दिसतात. आणि तेवढ्याच संख्येने रजा, पोस्टिंग अशा उलाढाली सुरू असतात. दिल्ली आणि चंदिगढ येथील संक्रमण शिबिरे विमानातून येणाऱ्या सैनिकांसाठी सज्ज केली जातात.
भारतीय वायू सेनेचे यातले काम अतुलनीय आहे. चंदीगढच्या एअरबसची सेवा पहाटे सुरू असते. पहाट होताच लडाखसाठी पहिला ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निघतो. त्यांच्या सोबत गरजेच्या वस्तू, सुट्ट्यांवरून परतणारे सैनिक यात असतात. लेह आणि सियाचनमधल्या तळावरून एमआय -1, ध्रुव आणि चित्ता हेलिकॉप्टर्स जगातल्या सर्वात खराब हवामानात उड्डाण करत असतात. वर्षभर ही वायुसेनेची मदत सुरूच असते. आणि हिवाळ्यात लडाख आणि देशांला जोडणारा हा एकमेव दुवा असतो.
एडब्ल्यूएसचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होते. हिवाळ्यात हजारो सैनिक तिथे राहायला तयार असल्याने नॉर्दन कमांड आणि लेह येथील लॉजिस्टिक्स अधिकाऱ्यांना आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि त्यात ते यशस्वी होतील याबद्दल मला अजिबातच शंका नाही. लष्कराचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. ‘ नवोदित हे रणनीतींबद्दल बोलतात, तर तज्ज्ञ लॉजिस्टिकचा अभ्यास करतात. ’ मला खात्री आहे, अधिकारी याप्रमाणेच वागतील.