हैदराबाद : ज्या कोविड 19 रुग्णांना मध्यम ते गंभीर स्वरूपाचा श्वसनाचा त्रास होत आहे , त्यांचे आयुष्य वाचवण्यासाठी प्लाझ्मा उपचार पद्धती दिवसेंदिवस जास्त उपयोगी पडत असल्याचे जाणवते. त्यामुळे बरे झालेल्या कोविड रूग्णांनी प्लाझ्मा दान करणे सध्याच्या काळात खूप गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आपण पुन्हा आजारी पडू या भीतीने रूग्ण बाहेर येऊन प्लाझ्मा दान करत नाहीत. म्हणूनच ईटीव्ही भारतने हैदराबादच्या थॅलेसिमिया आणि सिकल सेल सोसायटीच्या एमबीबीएस, डीसीएच, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुमन जैन यांच्याशी बातचीत केली. या मुलाखतीतील काही ठळक मुद्दे...
१. कोविड 19 उपचारात प्लाझ्मा उपचार पद्धतीचा काय उपयोग आहे?
‘ कोविडसाठी प्लाझ्मा उपचार पद्धती ‘ ही फक्त कोविड 19 च्या संसर्गातून बऱ्या झालेल्या रूग्णांकडूनच घेता येते. याला कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा असे म्हणतात, यात चांगल्या प्रकारचे अँन्टिबाॅडीज कोविड 19 च्या विरोधात लढायला तयार होतात. ही उपचार पद्धती फक्त गंभीर परिस्थितीत असलेल्या किंवा आयसीयुमध्ये असलेल्या रूग्णांसाठीच वापरली जाते. 90 टक्के रूग्णांना या उपचार पद्धतीची गरज नसते.
२. कोण दान करू शकते?
सर्व बरे होऊन 14 दिवस झालेले लोक प्लाझ्मा दान करू शकतात. तरीही अॅक्टिव्ह कोविड-19 आजारासाठी प्लाझ्मा दान करताना लॅबमधली निगेटिव्ह चाचणी असण्याची गरज नाही.
ही व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते :
- तो किंवा ती तंदुरुस्त आणि निरोगी हवे
- तो किंवा ती 17 वर्षे किंवा त्यांच्या पुढे हवे
- त्या व्यक्तीच्या शरीरात दान करण्यासाठी पुरेसे रक्त हवे
या व्यक्तीने प्लाझ्मा दान करू नये :
- ती व्यक्ती एचआयव्ही पाॅझिटिव्ह असेल
- ती व्यक्ती हेपटायटिस बी किंवा हेपटायटिस सी वाहक असेल
- एचटीएलव्ही पाॅझिटिव्ह असेल
- कधी सिफिलीसचा उपचार घेतला असेल
- डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय शरीर सौष्ठवासाठी ड्रग्जचे इंजेक्शन किंवा औषध घेतले असेल
३. उपचार घेतलेले रूग्ण किंवा बरे झालेले रूग्णच का प्लाझ्मा दान करू शकतात?
उपचार घेतलेलेच लोक प्लाझ्मा दान करू शकतात कारण त्यांच्या शरीरात कोविड 19 संसर्गाविरोधात लढणाऱ्या अँन्टिबाॅडीज तयार झाल्या असतात. एका रूग्णाने दान केलेला प्लाझ्मा दोन रूग्णांसाठी वापरता येतो.
४. मी किती वेळा प्लाझ्मा दान करू शकतो?
उपचार केलेल्या कोविड रुग्णांच्या शरीरात अँन्टिबाॅडीज शक्यतो 3 महिने मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यानंतर त्या कमी कमी व्हायला लागतात. त्यामुळे या 3 महिन्यात प्लाझ्मा दान केले तर जास्त परिणामकारक राहते.
दात्याच्या शरीरात चांगले अँन्टिबाॅडीज आहेत हेही निश्चित करावे लागते. म्हणून अनेकदा काही जण 3 महिन्यांत 6 वेळा प्लाझ्मा दान करताना आढळतात. अर्थात, रूग्णाची वैद्यकीय तंदुरुस्ती पाहूनच केंद्रातले डॉक्टर हा निर्णय घेतात.
५. मी प्लाझ्मा दान केला तर माझ्या जिवाला काही धोका आहे का?
प्लाझ्मा दान करून जिवाला अजिबात धोका नाही. प्रत्येक प्लाझ्मा दानाआधी कर्मचारी दात्याची तपासणी करतात आणि त्याचे आरोग्य आणि तो कुठे कुठे गेला होता याची चौकशी करतात. दात्याचा प्लाझ्मा काढताना वापरलेले उपकरण हे पूर्णपणे निर्जंतुक केले जाते आणि त्याचा वापर केल्यानंतर ते टाकून देतात. प्रत्येक प्लाझ्मा दानाच्या वेळी नवे उपकरण वापरले जाते.
६. मी प्लाझ्मा दान करायला कुठे जायचे? हे वेळखाऊ आहे का?
कुठलीही रक्त पेढी किंवा एफडीए प्रक्रियेची मान्यता असलेल्या सरकारी रुग्णालयात 60 ते 90 मिनिटांत हे काम होते. हे अजिबातच वेदनादायी नाही. प्लाझ्मा दानाची प्रक्रिया सुरू असताना तुम्ही एखादे पुस्तक वाचू शकता किंवा संगीत ऐकू शकता.
७. याबद्दल जागरूकता कशी पसरवायची ?
- प्लाझ्मा दान करण्यास उत्सुक असलेल्यांनी रक्त पेढी किंवा सरकारी रुग्णालयात आपल्या नावाची नोंदणी करावी.
- तुम्ही प्लाझ्मा दान केल्यावर त्याबद्दल सोशल मीडियावर लिहा. त्यामागचे कारण , तुमचा अनुभव याबद्दलही सांगा.
- प्लाझ्मा दान करणे कसे महत्त्वाचे आहे, याबद्दल तुम्ही तुमच्या
- कुटुंबाशी आणि मित्रांशी बोला. तुम्ही एखाद्या व्यक्तीला आयुष्याची ही भेट देण्यामागचे कारणही सांगा आणि प्लाझ्मा दान करायला इतरांना प्रोत्साहित करा.