हैदराबाद - सध्या जग दीर्घकालीन लॉकडाऊनमधून हळूहळू सावरत आहे. मनामध्ये भीतीचे वातावरण असूनही, लोक त्यांच्या दैनंदिन कामावर परत येत आहेत. काही देशांमध्ये तर लहान मुलं शाळेत जाण्यासाठी तयार होत आहेत. संपूर्ण जगभर पसरलेला हा विषाणू जगाच्या हृदयात धडकी भरवत असताना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारे सर्वतोपरी प्रयत्न करण्यास तयार आहेत. परंतु लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतरही जगातील परिस्थिती पूर्वीपेक्षा वेगळी असेल. कोरोना विषाणूने आपल्यासाठी मास्क परिधान करण्याचा नियम बनवला आहे. आता आपल्याला एखाद्याशी हात मिळवताना किंवा एखाद्याच्या जवळ बसताना विचार करावा लागणार आहे. तसेच पुढे जाऊन आपण सामाजिक अंतरही स्वीकारले पाहिजे.
इतिहासकार म्हणतात की, संसर्ग आणि मृत्यू दर कमी होणे त्याचबरोबर लोकांमध्ये रोगाविषयी असलेली भीती कमी होणे, हे साथीचा आजार नियंत्रणाखाली आहे याचे संकेत असतात. परंतु कोवीड -१९ च्या बाबतीत अद्याप वरीलपैकी कोणतेही संकेत तपासले गेले नाहीत. सध्या कोरोनावर कोणताही उपचार नाही. आणि लस निर्माण होईल की नाही याबद्दल कसलीही शाश्वती नाही. ज्या देशांनी या आजारावर नियंत्रण ठेवले. किंवा ज्या देशांनी लॉकडाउन सारखा उपाय निवडला त्या देशांना आता कळून चुकले आहे की, उपासमार ही कोरोनापेक्षा जास्त धोकादायक आहे. जागतिक नेत्यांनी ‘आता आपण कोरोना विषाणूसोबत जगायला शिकले पाहिजे’ अशा प्रकारचा सुर आवळला आहे. तर केवळ रेड झोनपुरते काही प्रमाणात निर्बंध असायला हवेत. भारतासारख्या देशांमध्ये आजारविषयी जागरूकता आणि वैद्यकीय सुविधा वाढल्यामुळे भारतातील नागरिकांमध्ये पून्हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
आता जगभरातील विविध कार्यालये नवीन नियमावली स्वीकारून पून्हा खुली होण्यास सज्ज आहेत. ज्यामध्ये कर्मचारी तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आलटून पालटून कामाला येण्याच्या नियमाचा समावेश आहे. त्याचबरोबर अनेक सॉफ्टवेअर कंपन्या घरातून काम करणाऱ्या आपल्या कर्मचार्यांच्या कामात वाढ करण्याच्या तयारीत आहेत. तर काही देशांमध्ये शाळाही सुरू झाल्या आहेत. परंतु सामाजिक अंतर, वैयक्तिक स्वच्छता आणि सॅनिटायझर-सुसज्ज वर्गखोल्या तयार करण्यावर त्यांचा जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा पून्हा सुरळीत होण्याचा संबध शाळा पून्हा सुरु होण्याशी आहे. शाळा पुन्हा सुरू झाल्याशिवाय त्यांचे पालक पून्हा कामावर जाणार नाहीत. शाळा सुरु करण्यामागचे हे एक महत्त्वाचे कारण होते. त्यामुळे जर्मनी आणि डेन्मार्क देशांनी शाळा आणि डेकेअर सेंटर पुन्हा सुरू केले आहेत. एक महत्त्वाची बाब म्हणजे स्वीडनने कोरोना महामारीच्या काळातही देशातील शाळा बंद केल्या नव्हत्या. परंतु या देशाने सामाजिक अंतराची काटेकोर अंमलबजावणी केली होती.
ऑस्ट्रियाही या आठवड्यात पुन्हा शाळा सुरु करणार आहे. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गटात विभाजन केले जाणार आहे. त्यातील ‘अ’ गटातील विद्यार्थी सोमवार ते बुधवार आणि ‘ब’ गटातील विद्यार्थी गुरुवार आणि शुक्रवारी शाळेत हजेरी लावतील. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना घरी राहण्याची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गाचे आयोजनही करण्यात येणार आहे. बर्याच देशांमध्ये ४० विद्यार्थ्यांची क्षमता असणाऱ्या वर्गात केवळ २० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. जर्मनीच्या न्युस्ट्रेलिझमधील एका हायस्कूलने आपल्या विद्यार्थ्यांना स्वयं-चलित चाचणी किटचे वाटप केले आहे. तर इकडे भारतात सध्या उन्हाळा सुरु असल्याने बहुतेक शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. तसेच दहावी व इंटरमिजिएटच्या परीक्षा घेण्याची व्यवस्था सरकारतर्फे केली जात आहे. अनेक विद्यापीठांनी तर यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेण्यास प्रारंभ केला आहे.
जर्मनीने सण किंवा कार्यक्रमांसाठी दोनपेक्षा अधिक कुटुंबे एकत्र येऊ शकत नाहीत, अशा प्रकारची अधिकृत घोषणा केली आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानेही अशाच प्रकारचा नियम लागू केला आहे. फ्रान्सने या सोमवारी लॉकडाऊनचे नियम कमी केले आहेत. सुमारे दोन महिन्यांनंतर फ्रेंच लोक परवानगीशिवाय घराबाहेर प्रवास करण्यास सक्षम ठरले आहेत. त्याचबरोबर पॅरिस मेट्रोमधील आसन व्यवस्थेत सामाजिक अंतराचा नियम राबविला जात आहे. स्पेनमध्ये सध्या लॉकडाउनचे निम्मे निर्बंध हटवले आहेत. तर ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथे सामाजिक अंतर विचारात घेऊन एक पार्क तयार करण्यात आला आहे. त्याठिकाणी प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ एक गेट आहे. ज्यामधुन एका वेळी फक्त एका व्यक्तीला जाण्याची परवानगी आहे. इतरांना त्यांचा नंबर येण्याची वाट पाहावी लागते.
लॉकडाउन संपवण्यापूर्वी चार घटकांचा विचार करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. १. प्रत्येक कोरोना रूग्णाला वैद्यकीय सेवा देण्याची क्षमता. २. लक्षणे नसणाऱ्या प्रत्येक रुग्णाची चाचणी घेण्यासाठी किटची उपलब्धता. ३. प्रत्येक रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांचा शोध घेण्याची आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची सुविधा. ४. कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी १४ दिवसांची उपाययोजना.
भारतामध्ये मंगळवारपासून जवळपास १५ रेल्वेगाड्या नवी दिल्लीहून अनेक राज्यांच्या राजधानींकडे रवाना होणार आहेत. त्याचबरोबर काही प्रमाणात बस आणि टॅक्सीही पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनापूर्वी ट्रॅफिक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहून नेणाऱ्या बसेस, गाड्या, टॅक्सी याचे नियम तोडणे सामान्य होते. पण आतापासून ४० सीटर बसमध्ये केवळ २० लोक प्रवास करू शकतील. भारतातील अनेक राज्यांतील रस्ते परिवहन महामंडळे (आरटीसी) असे बरेच नियम लागू करण्याच्या योजना आखत आहेत.
दरवर्षी अंदाजे ४.५ कोटी भारतीय लोक कामाच्या शोधात एका राज्यातून दुसर्या राज्यात स्थलांतर करतात. लॉकडाऊनमुळे देशातील लाखो स्थलांतरित कामगारांचे जीवनमान उद्धवस्त झाले असून बरेचजण बेघर झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यापैकी काहींनी मुळगावी जाण्यासाठी हजारो किमीचा रस्ता पायी तुडवला आहे. आता अशा कामगारांना विशेष गाड्या आणि बसेसमार्फत त्यांच्या मुक्कामी ठिकाणी पाठवण्याची सुविधा उपलब्ध केली जात आहे. तर परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष विमानसेवा पुरवली आहे.
सोमवारी चीनमधील शांघाय डिस्नेलँड पुन्हा खुले करण्यात आले आहे. प्रशासनाने पर्यटकांना मास्क घालणे आणि सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक केले आहे. चीन सरकारने दररोज २४ हजार पर्यटक संख्येची मर्यादा निश्चित केली आहे. जी नेहमीच्या तुलनेत एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे. लॉकडाउननंतर पुन्हा उघडणारे हे पहिले डिस्नेलँड आहे. हा डिस्नेलँड पून्हा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर डिस्नेच्या शेअर मूल्यांत ८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
हेही वाचा : 'कदाचित कोरोना विषाणू कधीच पूर्णपणे जाणार नाही'